खारघर : प्रतिनिधी
अतिशय घातक समजला जाणारा जैविक कचरा शहरातील केतकी हॉटेल परिसरात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जैविक कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, मात्र सर्रास रस्त्यावर हा कचरा टाकणार्याचा छडा लावण्याची मागणी केली जात आहे.
वैद्यकीय टाकाऊ औषधे आणि साहित्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे विशेष सुविधा करण्यात आली आहे. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कंपनी या एजन्सीमार्फत हे काम केले जाते. त्यामुळे वैद्यकीय टाकाऊ औषधांचा जैविक कचरा कुठेही टाकू नये, याविषयी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वारंवार मार्गदर्शन केले जाते, मात्र त्यानंतरही असे प्रकार आढळत असल्याने कठोर कारवाईची गरज आहे. पनवेलमध्ये केतकी हॉटेल परिसरात अशाप्रकारे जैविक कचरा मागील दोन दिवसापासून टाकला जात आहे. रात्रीच्या वेळेला अशाप्रकारे कचरा टाकून काही जण पोबारा करीत असल्याचे प्रकार शहरात घडत असतात. या कचर्यामध्ये औषधाच्या बाटल्या, इंजेक्शन, हॅण्डग्लोज आदींसह विविध वैद्यकीय औषधांचा समावेश आहे. शहरात दोन दिवसांपूर्वी अशाचप्रकारे उघड्यावर टाकल्याने सफाई कर्मचारी सीताराम धोत्रे या कर्मचार्याला सीरिंज टोचल्याने त्याला ताप भरला. अशाप्रकारे कचरा रस्त्यावर टाकण्याचे प्रकार सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात घडले आहेत. हा कचरा कोण टाकतो याबाबत अद्याप कोणाचेही नाव पुढे आले नाही. कायद्यानुसार अशाप्रकारे जैविक कचरा रस्त्यावर अथवा उघड्यावर टाकणे हा कायदेशीर गुन्हा आहे.
बायोमेडिकल वेस्ट (जैविक) कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सोबत रजिस्ट्रेशन केले हाते. संबंधित कंपनीची गाडी येऊन हा जैविक कचरा गोळा करते. संबंधित कचर्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाते. जैविक कचर्यातील इंजेक्शन रुग्णांना टोचलेले असते. अशा वेळी उघड्यावर टाकलेल्या या इजेंक्शनमुळे या कचर्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. कोणत्याही घातक आजाराची लागण या कचर्याच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकारावर कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे.
– अशाप्रकारे उघड्यावर जैविक कचरा टाकणे हा गुन्हा आहे. या संदर्भात पाहणी करून पुढील कारवाई केली जाईल. वैद्यकीय टाकाऊ औषधे आणि साहित्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट विशेष सुविधा आहे. संबंधित कंपनीची गाडी येऊन हा कचरा गोळा केला जातो.
-डॉ. रमेश निकम
वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका