पनवेल ः प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील सिडको हद्दीतील आदई तलावाचा गणेश विसर्जन आणि छटपूजा घाट, नवीन पनवेल सेक्टर 11मधील उद्यानातील दुरूस्तीची, रस्ते आणि गटारांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकार्यांना शुक्रवारी (दि. 7) दिल्या.
शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेत समाविष्ट असलेल्या सिडको हद्दीतील नवीन पनवेल सेक्टर 11मधील आदई तलाव, स्व. राजीव गांधी मैदान, शहीद तुषार चव्हाण उद्यान, रस्ते आणि गटारांच्या कामांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे आणि सिडकोचे मानकर, कांबळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदई तलावाजवळील गणेश विसर्जन आणि छटपूजा घाटाची दुरूस्ती, शहीद तुषार चव्हाण उद्यानातील पदपथ, तेथील शौचालयांचे दरवाजे व इतर दुरूस्ती, नवीन पनवेल सेक्टर 11मधील रस्ते आणि गटारांची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करण्याचे आदेश सिडको अधिकार्यांना दिले. यानंतर स्व. राजीव गांधी मैदानाचीही पाहणी करून पावसाळ्यानंतर त्याचा वापर कसा करता येईल याबाबत चर्चा करून अधिकार्यांना सूचना दिल्या. या वेळी सिडकोच्या अधिकार्यांनी पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper