Breaking News

विमानतळ प्रकल्प गावांतील शाळा स्थलांतरित!

पनवेल : बातमीदार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थलांतरित होणार्‍या दहापैकी दोन गावांनी अजूनही आपली राहती घरे सोडली नाहीत, मात्र या दोन्ही गावांतील शाळांचा प्रश्न मिटला असल्याने सोमवार (दि. 17) पासून जिल्हा परिषदेच्या गावातील शाळा आता उलवे नोडमध्ये सिडकोने उभारलेल्या नवीन इमारतींमध्ये सुरू होत आहेत. यानंतर गावे रिकामी करण्याचा ओघही वाढण्याची चिन्हे आहेत.

गावे रिकामी करण्यासाठी ग्रामस्थांना 15 तारखेची मुदत देण्यात आली होती. ही मुदत उलटली आहे. या मुदतीत 10 ते 12 कुटुंबांनी घरे रिकामी केली आहेत, मात्र अजूनही उलवा आणि कोंबडभुजे ही दोन गावे पूर्णपणे रिकामी झालेली नाहीत. नुकतीच येथील ग्रामस्थांची सिडकोचे अधिकारी संदीप माने यांच्यासोबत बैठक झाली. आता मुदतीच्या फेर्‍यात न अडकता गावे लवकरात लवकर खाली करा, असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले आहे. तुमचे जे काय प्रश्न प्रलंबित आहेत, ते आम्हाला सांगा, ते सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसात स्थलांतर करणे अवघड आहे. सर्वांच्या मताने विचार केला जाईल आणि पूर्ण समाधान झाल्यावरच गावे रिकामी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

दुसरीकडे गावातील शाळा आता सोमवारपासून सिडकोने उभारलेल्या नवीन शाळा इमारतींमध्ये स्थलांतरित केल्या जाणार आहेत. तिथेच नवीन शाळेचे वर्ग भरणार आहेत. गावातील मुलांना शाळेपर्यंत नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बस दररोज गावात येऊन मुलांना शाळेत घेऊन जाणार आहेत, मात्र या चार गावांपैकी दोन गावे पूर्णपणे येथून उठली असल्याने ग्रामस्थ अनेक ठिकाणी विखुरले गेले आहेत. त्यामुळे किती विद्यार्थी प्रत्यक्षात येथे शाळेत येतील, हे शाळा सुरू झाल्यावरच कळेल. या इमारतीच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरवले जाणार असल्याची माहिती आहे. या शाळेमध्ये मुलांना काही सोयीसुविधा पुरविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार सर्व तपासणीही ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी केली जाणार आहे, अशी माहिती उलवे गावचे ग्रामस्थ पुंडलिक म्हात्रे यांनी दिली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply