Breaking News

आदिवासी माळरानावर उभारणार नाग्या कातकरींचे स्मारक ; वनवासी कल्याण आश्रमच्या प्रयत्नांना यश

उरण ः प्रतिनिधी

चिरनेर येथील आक्कादेवी माळरानावर 25 सप्टेंबर 2018 रोजी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपस्थित सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील व रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस महेश बालदी यांनी

नाग्याबाबांच्या स्मारकासाठी प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन राज्याच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूर्णत्वास नेण्यात आले आहे.

वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांत या संस्थेने काढलेल्या वणवा मोर्चात जनजाती समाजाच्या विकासासाठी विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील एक मागणी जनजाती समाजातील क्रांतिकारकांची राज्य सरकारने योग्य दखल घेऊन जनजाती समाजाचा इतिहास जाज्ज्वल्य करण्यासाठी जनजाती क्रांतिकारकांचे स्मारक उभे करावे अशी होती. याचा विचार करून राज्य सरकारच्या विधिमंडळातील अर्थसंकल्पात जनजाती समाजातील क्रांतिकारी हुतात्म्यांच्या स्मारकांसाठी सुमारे 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

25 सप्टेंबर 1930च्या गौरवशाली आणि शौर्यशाली चिरनेर जंगल सत्याग्रहात देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामध्ये या परिसरातील आठ शूरवीरांनी आपले प्राण अर्पण करून बलिदान दिले. त्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आदिवासी दुर्बल घटकातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचे स्मारक जंगल सत्याग्रह झालेल्या ठिकाणी आक्कादेवी डोंगराच्या पायथ्याशी व्हावे, अशी मागणी वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्यांनी केली होती. ती आता पूर्णत्वास आली आहे.  या स्मारकासह राज्यातील अन्य ठिकाणच्या जनजाती क्रांतिकारकांच्या हुतात्मा स्मारकांसाठीही निधीची उपलब्धता करण्यात आली आहे. दरम्यान, जनजाती समाज, हुतात्मा नाग्या कातकरी इतिहासकार वसंतभाऊ पाटील चिरनेर, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र, चिरनेर ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य तसेच महेश बालदी मित्र मंडळ, उरण यांच्या अथक परिश्रमांना यश आले आहे. याबद्दल समाजाकडून सरकारचे आभार मानण्यात आले आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply