अंबा नदीवरील बंधार्याचे दरवाजे उघडले; पाली ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट
पाली : प्रतिनिधी
अंबा नदीतून पाली (ता. सुधागड) गावाला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी पाटबंधारे विभागाने बलाप गावाजवळ बंधारा उभारला आहे. पावसाळा संपल्यानंतर बंधार्याच्या फळ्या (पत्रे) लावून अंबा नदीचे पाणी या बंधार्यात अडविले जाते. पावसाळा सुरु झाल्यावर या फळ्या काढल्या जातात. पाऊस लांबल्याने सध्या अंबा नदी व बलाप बंधार्यातील पाणीसाठा कमी आहे. मात्र त्याचा विचार न करता तसेच पाली ग्रामपंचायतीला कुठलीही पुर्वसूचना न देता पाटबंधारे विभागाने या बंधार्याच्या फळ्या (पत्रे) काढून टाकल्या आहेत. त्यामुळे अंबा नदी व बलाप बंधार्यातील पाणीसाठा कमी झाला असून, पाली ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर बंधार्याच्या फळ्या काढल्या नाही तर पूर येण्याची किंवा बंधारा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षी नियमित पाऊस सुरू झाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयाकडून बलाप बंधार्याच्या फळ्या (पत्रे) काढल्या जातात. या वेळी मात्र पाटबंधारे विभागाने या फळ्या (पत्रे) काढण्याची घाई केली आहे, असे पाली ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. पाऊस लांबला आहे. अंबा नदी पात्रात पाणी कमी आहे. अशा वेळी बंधार्याच्या फळ्या काढणे उचित नव्हते. मात्र पाटबंधारे विभागाने ठरलेल्या वेळी व नियमानुसार बलाप बंधार्याच्या फळ्या काढल्या आहेत. तसेच बंधार्याच्या फळ्या काढताना ग्रामपंचायतीला पूर्वसूचनाही दिली नाही. पाटबंधारे विभागाच्या या घिसाडघाईचा फटका पाली ग्रामस्थांना बसला आहे. बंधार्यातील पाण्याने तळ गाठल्याने ऐन पावसाच्या तोंडावर ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नियोजनाप्रमाणे आम्ही आमचे काम केले आहे, असे सांगून पाटबंधारे विभागाने हात वर केले आहेत. पाटबंधारे विभागाचे कोलाड शाखा अभियंता रामदास सुपे यांच्याशी भ्रमणध्वणीवरुन संपर्क साधून, पाली ग्रामस्थांच्या सोयीसाठी पुन्हा या बंधार्याच्या फळ्या लावता येतील का, असे विचारले असता. त्यांनी सांगितले की, आम्हाला असे करता येणार नाही. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काम केले आहे. उलट या वेळी फळ्या काही दिवस उशिराने काढल्या आहेत. ग्रामपंचायत नदीवर तात्पुरत्या स्वरुपाचा बंधारा टाकून पाणी अडवू शकते, असे सुपे म्हणाले. मात्र हे काम लगेच होण्यासारखे नाही. तसेच आता अंबा नदी व बलाप बंधार्यातील पाणी घटले आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 17) पाली ग्रामपंचायतीने अंबा नदीवर पंप लावून जॅकवेलमध्ये पाणी भरुन ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला. मंगळवारीही याच पद्धतीने साठवण टाक्या भरल्या. मात्र यामुळे वेळ व श्रम यांचा अपव्यय होत असून पाणीदेखील कमी पडते.
हवामान खात्याने यंदा पाऊस उशीरा येणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. ते माहीत असूनही पाटबंधारे विभागाने बलाप बंधार्याच्या फळ्या काढण्याची घाई केली. ग्रामपंचायतीला पुर्वसूचनाही दिली नाही. त्यामुळे आता ग्रामस्थांना पाणी कसे पुरवावे, हा प्रश्न आम्हाला पडला आहे.
-विजय मराठे, उपसरपंच, ग्रामपंचायत पाली, ता. सुधागड
दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यावर बलाप बंधार्याच्या फळ्या काढल्या जातात. या वेळी आम्ही त्या फळ्या उशिराने काढल्या आहेत. फळ्या वेळेवर काढल्या नाहीत, तर आम्हाला उत्तरे द्यावी लागतात. आता पुन्हा बंधार्याच्या फळ्या बसविणे शक्य नाही. पाणी कमी पडते तेव्हा ग्रामपंचायत नेहमी नदीवर तात्पुरता बंधारा बांधते, तसे या वेळीही करुन ग्रामपंचायतीने पाणी अडवावे.
-आर. के. सुपे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, कोलाड