Breaking News

‘नाणार’ रायगडमध्ये होणार

मुंबई ः प्रतिनिधी

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे.

सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा हा सुमारे तीन लाख कोटींचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु शिवसेनेने नाणारला विरोध केला. तसेच भाजपबरोबर युती करताना हा प्रकल्प रद्द करण्याची अट घातली होती.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून यावेळी विधानसभेत लेखी उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली आहे.

तसेच प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास स्थानिकांचा विरोध नसल्याचेही मुख्यंत्र्यांनी म्हटले आहे. 40 गावातील ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध नाही, असेही त्यांनी सांगितलं आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, निसर्गाची हानी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. शिवसेनेनेदेखील कोकणातील जनतेच्या बाजूने भूमिका घेत या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला होता. 

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply