कर्जत : बातमीदार
नेरळ रेल्वे स्थानकात काही दिवसांपूर्वी पत्र्याची शेड नव्याने बसविण्यात आली आहे. मात्र ज्या भागात नवीन पत्रे लावण्यात आले, अगदी त्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याचे धबधबे कोसळत आहेत.
नेरळ रेल्वे स्थानकातील फलाटांवरील पत्रे बदलण्यात आले आहेत. फलाट एक आणि दोन तसेच माथेरान गाडी उभ्या असलेल्या फलाटांवरदेखील नवीन पत्रे टाकण्यात आले आहेत. मात्र फलाट एकवरील पत्र्यामधून पाणी थेट खाली फलाटावर येत आहे. लोकलमधून उतरणार्या प्रवाशांना त्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नेरळ प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर, तसेच राजेश गायकवाड, मिलिंद विरले, आबा पवार, प्रभाकर देशमुख आदी पदाधिकार्यांनी मध्य रेल्वेने ठेकेदारावर कारवाई करावी आणि तात्काळ शेड दुरुस्त करावी, अशी मागणी केली आहे.