Breaking News

विचारांची लाखोली

शिवसेना नेत्यांची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाषणे ऐकल्यानंतर या मेळाव्याला विजयादशमी मेळावा म्हणावे की शिमग्याचा कार्यक्रम असा प्रश्न कोणालाही पडला असता. काहीही करून भारतीय जनता पक्षाला झोडपून काढायचे या एककलमी कार्यक्रमात सार्‍या वक्त्यांची भाषणे आणि उपस्थितांचा वेळ या दोन्हीही गोष्टी वाया गेल्या. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी आपल्या पाऊण तासाच्या भाषणात फक्त आणि फक्त भाजपवर टीकास्त्र सोडले. पाऊण तासाचा जळफळाट या तीनच शब्दांत यंदाच्या मेळाव्याचे वर्णन करावे लागेल.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची काही लोकांची वृत्ती असते. त्यातूनही हे हळकुंड सत्तेचे असेल तर अशा व्यक्तीला सारे काही पिवळेच दिसू लागते. प्रचंड खटाटोपानंतर सत्ता बळकावणार्‍या विद्यमान ठाकरे सरकारची अवस्था अशीच झालेली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडला, परंतु तो शिवाजी पार्क मैदानात प्रचंड गर्दीत होऊ शकला नाही. कारण उघडच होते. कोरोनाने एकंदर राजकीय घडामोडींवर अनेक निर्बंध आणले आहेत. शिवाजी पार्क ऐवजी शिवसेनेने यंदाचा मेळावा तेथून जवळच असलेल्या स्वातंत्र्यवीर स्मारकाच्या सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी निवडक 50 निमंत्रित उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली यात अनपेक्षित असे काही नाही. इतकी वर्षे ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांच्यासोबत ते सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्या पक्षासोबत तीन दशकांहून अधिक काळ मैत्रभाव जपला तो पक्ष आज विरोधात उभा आहे. यामुळे भाजपवर टीका करण्यावाचून त्यांना पर्यायच नव्हता. परंतु आक्षेपार्ह भाग असा की आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुखांनी सर्व मर्यादा सोडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राज्यकारभाराचे सल्ले देण्यापर्यंत मजल मारली. उदाहरणार्थ, जीएसटीचा निर्णय चुकला असेल तर पंतप्रधानांनी तसे मान्य करावे व जुनी करप्रणाली परत आणावी असा अजब सल्ला देऊन शिवसेना पक्षप्रमुखांनी मर्यादा तर ओलांडलीच परंतु आपले अर्थविषयक अज्ञान देखील उघड केले. जीएसटीची एक कौन्सिल असते व या कौन्सिलमध्ये प्रत्येक राज्याचा अर्थमंत्री सहभागी असतो. वस्तू व सेवाकर प्रणाली म्हणजेच जीएसटी देशभर लागू करण्यापूर्वी प्रचंड विचारमंथन झाले आहे व त्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ तसेच सर्व राजकीय पक्षांचे नेते यांचा सक्रीय सहभाग होता. इतके घडून गेल्यावर जीएसटी करपद्धती फसली असे म्हणणे कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यास शोभणारे नाही. परंतु शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा मास्क उतरवून एक निरर्थक व निव्वळ राजकीय असे भाषण करण्यात वेळ फुकट घालवला. पंतप्रधान मोदी यांना कारभार कसा करावा याचे सल्ले देणे हास्यास्पद आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाविषयी हेटाळणीयुक्त डायलॉगबाजी करणे हे खरे तर उद्वेगजनक म्हणावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी हिंदुत्व ही त्वचा आहे तर शिवसेनेसाठी ती सोयीस्कर बदलता येणारी खांद्यावरची शाल आहे, अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. ती पुरेशी बोलकी आहे. यंदाच्या मेळाव्यास शिवसेनेने महाविजयादशमी मेळावा असे म्हटले होते. एकंदरीत मेळाव्याचे स्वरुप आणि त्यातील भाषणबाजी बघता हा महाफ्लॉप मेळावा म्हणावा लागेल.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply