Breaking News

भूमिगत केबलचा वाद चिघळला

कर्जतमधील नागरिकांची महावितरण, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर कारवाईची मागणी

कर्जत : बातमीदार

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नेरळ -कळंब रस्त्याशेजारुन टाकण्यात येणार्‍या भूमिगत विद्युत वाहिनीबाबतचा वाद चिघळला असून  ठेकेदार कंपनीच्या मनमानी विरोधात स्थानिक आंदोलनाचे शस्त्र उगारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या नियमबाह्य कामाबाबत महावितरण आणि बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांनी केली आहे. कर्जत तालुक्यातील वरई येथील खासगी व्यावसायिकाच्या गृह प्रकल्पाकरिता वारे येथील स्विचिंग स्टेशनपर्यंत भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्यात येत आहे. सुमारे 22 केव्ही इतक्या तीव्र क्षमतेची ही वाहिनी असल्याने काम सुरू करण्यापुर्वी प्रवासी, वाहनचालक, शेतकरी यांच्या सुरक्षेबाबत नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र महावितरण व सार्वजनिक बांधकाम या दोन्ही विभागांनी  या धोकादायक कामास परवानगी दिली आहे. त्यात सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतच रस्त्यालगत भूभाडे भरून करण्यात यावे, असे म्हटले आहे. सूर्या सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीने भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्यासाठी रस्त्याची साईडपट्टी खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्याचे नुकसान तर होत आहे, पण शासकीय निधीतून लावलेली झाडे, तोडण्यात येत आहेत. साईडपट्टी जेसीबीमशीनद्वारे पूर्ण खोदल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आला आहे. नियमानुसार रस्त्याच्या पृष्ठभागापासून 1.65 मी. इतक्या खोलपर्यंत खोदकाम न करता केवळ 1ते 2 फुट खोदून केबल टाकण्यात येत आहे.  हे काम क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली करण्याचे आदेश असताना एकही अधिकारी या कामाकडे फिरकलेला नाही. प्रवाशांच्या सुरक्षेची कुठलीही दक्षता या कंपनीने घेतलेली नाही उलट चुकीच्या व धोकादायक पद्धतीने काम सुरू असल्याने प्रवासी व शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

शासकीय अधिकार्‍यांची नकारात्मक भूमिका

याबाबत महावितरणचे उपअभियंता आनंद घुळे यांना शेतकर्‍यांनी या कामात शेतकरी व प्रवासी यांच्या सुरक्षेची हमी तुम्ही देता का?असा प्रश्न विचारला तेव्हा कुणाच्याही सुरक्षेची हमी आम्ही देणार नाही, अशी नकारात्मक प्रतिक्रिया मिळाली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश श्रावगे यांना शेतकरी व प्रवाशी यांच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सतीश श्रावगे आपल्या कार्यालयीन वेळेत पत्रकार व नागरिक यांचा फोनदेखील स्वीकारत नाहीत. पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीरपणे कंपनी काम करत असल्याने चिडलेल्या शेतकर्‍यांनी नेरळचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणचे अधिकारी या धोकादायक कामात कंपनीची पाठराखण करत असतील तर आम्हाला नाईलाजास्तव कायदा हातात घ्यावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. पोशीर ग्रामस्थांच्या तक्रारींचे अवलोकन करून उप अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी अभियंता महावितरण यांना दि. 12 जून 2019 रोजी सदर कंपनीला काम स्थगित करण्यात यावे असा आदेश दिलेला होता.

ठेकेदार कंपनी तसेच महावितरण आणि बांधकाम विभाग शेतकर्‍यांच्या जीवावर उठले असून, कुठल्याच प्रकारची सुरक्षा नाही. जीवित व वित्तहानी झाल्यास त्यास संबंधित कंपनी व अधिकारी जबाबदार असतील. तक्रारींची दखल न घेतल्यास आम्ही आंदोलनाचा निर्णय घेऊ

-तुषार राणे, स्थानिक शेतकरी

ठेकेदार कंपनी नियमांचे पालन करत नसल्याची ग्रामस्थ व शेतकरी आणि ग्रामपंचायत यांनी लेखी तक्रार केली असून सदर कामाची समक्ष पाहणी करण्यास संबंधित अधिकारी यांना सांगितले आहे. काम नियमबाह्य व धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस संरक्षण दिले जाणार नाही.

-सोमनाथ जाधव, सहाय्यक निरीक्षक, नेरळ पोलीस ठाणे

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply