कर्जत ः बातमीदार – कर्जत शहरातील दिनेश कडू यांची कन्या ध्रुवी तिसरीत शिकत असून तिने पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे सायकल घेण्यासाठी पिग्मी बँकेत ठेवले होते. ते पैसे या लहानशा मुलीने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गोरगरीब जनतेला बिस्किटे घेण्यासाठी खर्च केले आहेत.
आपली पिग्मी बँक फोडून ध्रुवी सायकल घेणार होती, मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची स्थिती लक्षात घेऊन या पैशांतून गोरगरिबांना मदत करण्याचा संकल्प तिने आपले वडील दिनेश कडू यांना सांगितला.
त्यानंतर कडू यांनी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ध्रुवीने बिस्किटे खरेदी करून पोलीस दलाकडे दिली. ही बिस्किटे पोलीस दलाकडून ग्रामीण भागात वाटण्यात आली. याबद्दल ध्रुवीचे सर्वत्र कौतुक होत आहे.