इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा
जाकार्ता : वृत्तसंस्था
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूने चीनच्या चेन यूफीवर 21-19 आणि 21-10 अशी सहज मात केली.
जाकार्तामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसर्या मानांकित ओकुहाराला शह दिल्यानंतर सिंधूला उपांत्य फेरीत चीनच्या दुसर्या मानांकित चेन यूफी हिचा सामना करावा लागला. चेन यूफीवर कुरघोडी करीत सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला.
46 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला सुरुवातीला स्थिरावण्यासाठी जरा वेळ लागला. प्रथम काही गुणांनी मागे पडल्यावर दमदार पुनरागमन करीत तिने 26 मिनिटांत 21-19 अशी कमाई केली. दुसर्या पट्टीवर खेळताना तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला गुण कमवण्याची अजिबात संधी दिली नाही आणि पुढील 20 मिनिटांतच विजेतेपद आपल्या नावावर नोंदवले.
अंतिम फेरीसाठी सिंधूला पुन्हा एकदा जपानी खेळाडू अकाने यामागुची हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात सिंधूने यामागुचीवर 10-4 अशी मात केली होती.
याआधी सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा अडथळा पार करीत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. सिंधूने 44 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात जपानच्या तिसर्या मानांकित ओकुहारावर 21-14, 21-7 अशी आरामात मात केली होती. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनेक पदकांना गवसणी घालणार्या सिंधूला आता नवे पदक खुणावत आहे.