Breaking News

दुसरी एसी लोकल लवकरच

मुंबई ः प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेचे प्रवासी ज्या लोकलची आतुरतेने वाट पाहत आहेत, अशी बहुप्रतिक्षित दुसरी एसी लोकल या आठवड्यात मुंबईत दाखल होत आहे. लवकरच या लोकलची चाचणीही घेण्यात येणार आहे. ही लोकल चैन्नईच्या कारखान्यातून निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील उपनगरीय मार्गावर या लोकलची चाचणी घेतल्यानंतर रेल्वे सुरक्षा विभागाच्या आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली. 25 डिसेंबर 2017 रोजी मुंबईत पहिली एसी लोकल धावली. या लोकलच्या विरार आणि चर्चगेटदरम्यान दिवसाला 12 फेर्‍या होतात. शनिवार आणि रविवारी मात्र एसी लोकल बंद असते. नव्या एसी लोकलच्या एका कोचवर सौर पॅनल बसवण्यात आले आहे. 3.6 किलोवॅट इतकी या पॅनलची क्षमता आहे. यावर डब्यातील दिवे आणि पंखे चालणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर कोचसाठीसुद्धा ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. सौर पॅनल असणारी ही देशातील पहिली ट्रेन ठरणार आहे. ’ट्रेन-18’ च्या धर्तीवर या नव्या एसी लोकलच्या डब्यांची रचना, तसेच तंत्रज्ञान असणार आहे. नव्या एसी लोकलच्या डब्यांमधील रचना जवळजवळ ’ट्रेन 18’ सारखीच असणार आहे. नव्या लोकलची वेग वाढवण्याची क्षमताही पहिल्या लोकलहून अधिक आहे, मात्र दरवाजे उघडणे आणि बंद करण्यासाठी लागणारा अधिकचा वेळ यात भरून निघणार आहे. ही नवी एसी लोकल मार्च महिन्यात मुंबईत दाखल होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ता रवींद्र भाकर यांनी दिली आहे.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply