अलिबाग : प्रतिनिधी
सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 4) सलग दुसर्या दिवशी अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. पाऊस आणि भरतीचे पाणी यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.
मुसळधार पावसाने रायगडला झोडपून काढले. त्यामुळे दरडी कोसळल्या, रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक बाधित झाली. शेती, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पेण व अलिबाग तालुक्यात घरांमध्ये पाणी घुसून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलिबाग शहर जलमय झाले होते. पेण तालुक्यातील वाशी विभागात पाणी शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. या भागातील लोकांना तेथून हलविण्यासाठी एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले होते.
जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत सरासरी 252.40 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पेण तालुक्यात सर्वाधिक 493 मिमी पावसाची नोंद झाली.
अलिबागमध्ये पाणी शिरले
अलिबाग शहरातील विविध भागांत दीड ते दोन फूट पाणी भरले होते. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापार्यांचे नुकसान झाले. पीएनपी नाट्यगृहातही पाणी घुसले होते. अलिबाग एसटी आगाराने तलावाचे रूप धारण केले होते. त्यामुळे बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. तालुक्यातील पेझारी, मानकुले, बहिरीचापाडा, नागाव, पोयनाड, नवेदर बेली, खानाव, श्रीगाव, मेढेखार, धेरंड, शहापूर, शहाबाज या गावांमध्ये अनेक घरांत पाणी शिरले. किहिम-कामत गावांत 12 घरांमध्ये पाणी शिरले. तेथील गावकर्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेे. नागेश्वर देवस्थान असलेल्या आवासमध्येही रात्रीच्या पावसामुळे पाणी वाढले होते. अनेक गावांत वीजपुरवठा रात्रभर खंडित झाला होता. अलिबाग तालुक्यात आवास, सारळ, रेवस मार्गावर झाडे कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. बोरघर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रामराज गावाचा संपर्क तुटला होता. हे गाव चारही बाजूने पाण्याने वेढले गेले होते, मात्र ते टेकडीवर असल्याने तेथे रेस्क्यु ऑपरेशनची गरज भासली नाही.
पेण तालुक्याला अतिवृष्टीचा फटका
पेण तालुक्यातील वाशी विभागाला अतिवृष्टीचा फटका बसाला. उधाणाचे पाणी वाशी, कणे, बोर्जे, दादर, मोठे भाल आण वढाव गावांत शिरले होते. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना तटरक्षक दल, एनडीआरएफ आणि स्थानिक रिव्हर राफ्टींग पथकांनी सुरक्षितस्थळी हलविले. अंतोरा येथे पुराचे पाणी घरांमध्ये घुसले. तेथे पाण्यात अडकलेल्या 64 जणांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. कणे गावात पुरात अडकलेल्या 120 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वाशी येथील 50 कुटुंबांना ग्रामपंचायत कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले. तांबडशेत येथे रस्त्यावर पाणी आल्याने जोहेकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. पेण येथे दुष्मी रेल्वेगेट परिसरात भूस्खलन झाल्याने रेल्वेमार्गावर मातीचा ढिगारा आला. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील सेवा विस्कळीत झाली. सकाळी साडेसहा वाजल्यापासून राजधानी एक्स्प्रेस या परिसरात अडकून पडली.
नागोठण्यात पुराचे पाणी घुसले
अंबा नदीला पूर आल्यामुळे या पुराचे पाणी नागोठण्यात शिरले होते. पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटींच्या साह्याने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले; तर पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने रसायनी आणि आपटा परिसराला पुराचा तडाखा बसला. आपटामार्गे रसायनीकडे जाणारा मार्ग बंद होता. उरण तालुक्यात चिरनेर-खारपाडा मार्गावर पाणी साचल्याने तेथील वाहतूकही बंद करण्यात आली होती.
कर्जतमध्ये 50 गावांचा संपर्क तुटला
कर्जत तालुक्यातील शेलू येथून चारशे कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. नेरळ-कळंब मार्गावरील दहिवली पूल पाण्याखाली गेल्याने सुमारे 50 गावांचा संपर्क तुटला. शेलू ते नेरळदरम्यान रेल्वेमार्गावरील खडी वाहून गेली होती. त्यामुळे कर्जत ते कल्याणदरम्यानची रेल्वे वाहतूक बंद होती.
माणगावमध्ये दरड कोसळली
माणगाव येथील कुंभ मार्गावर दरड कोसळली. चिंचवली सोन्याची वाडी येथून 63 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुळशी धरणातून पाणी सोडल्याने ताम्हणी घाटातून पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती.
तालुकानिहाय पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)अलिबाग 331, पेण 493, मुरूड 235, पनवेल 170.60, उरण 180, कर्जत 288, खालापूर 240, माणगाव 165, रोहा 206, सुधागड 245, तळा 266, महाड 197, पोलादपूर 152, म्हसळा 210, श्रीवर्धन 216, माथेरान 440. एकूण 4038.40. सरासरी 252.40.
RamPrahar – The Panvel Daily Paper