नागोठणे : प्रतिनिधी
पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केल्याने मध्यरात्री येथील अंबा नदीने पुन्हा एकदा आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने नागरिकांची, तसेच व्यापार्यांची तारांबळ उडाली. रविवारी (दि. 4) पुरात अडकलेल्या 20 जणांना सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने कोठेही जीवितहानी झाली नाही. भाजपचे नेते माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी दुपारी 4 वाजता शहरात येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला.
मध्यरात्री येथील अंबा नदीने शहरात प्रवेश केला होता. पुराचे पाणी वेगाने वाढत आहे, असे नागरिकांच्या लक्षात आल्याने घरातील साहित्य घरातच सोडून त्यांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन आसरा घेतला, तर व्यापारी बांधवांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला. पाण्याची पातळी वाढल्याने अनेकांचा माल भिजून खराब झाला. सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ग्रा. पं. सदस्य शैलेंद्र देशपांडे, ज्ञानेश्वर साळुंके, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, अनंत म्हात्रे, शिवाजी केंद्रे यांच्यासह पोलीस, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संभाव्य पुराची परिस्थिती लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पूरग्रस्त भागात फिरून नागरिकांना घरातून बाहेर पडण्याच्या सूचना देण्याचे काम केले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper