Breaking News

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ; राहुल आवारेची निवड

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी मंगळवारी (दि. 20) झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत राहुलने 61 किलो वजनी गटात रवींदरचा 6-2 असा पराभव केला. 14 सप्टेंबरपासून कझाकस्तान येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याची पायरी आहे. त्यामुळे राहुलकडून अनेकांच्या अपेक्षा लागल्या आहेत.

संघटनेतील राजकारणाचा बळी पडल्याने राहुलला 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याने 2018 ध्ये गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले आणि विरोधकांना चपराक लगावली. राहुलने राष्ट्रकुल स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. आता त्याने निवड चाचणी स्पर्धेत 61 किलो वजनी गटात बाजी मारून जागतिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली आहे. उपांत्य फेरीत त्याने नवीन कुमारवर 9-4 असा विजय मिळवला होता.

राहुलने 2018मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने 57 किलो वजनी गटात सहभाग घेतला होता, परंतु या जागतिक स्पर्धेत 61 किलो वजनी गटात खेळावे लागणार आहे. राहुलसह दोन ऑलिम्पिक पदक नावावर असलेल्या सुशील कुमारनेही जागतिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली. त्याने जितेंदर कुमारला पराभूत केले.

मी मागच्या दोन-तीन स्पर्धांमध्ये 61 किलो वजनी गटातून खेळलो. त्यापैकी पहिल्या दोन स्पर्धांमध्ये मी कांस्यपदक जिंकले व एका स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे जागतिक स्पर्धेतही मला पदकाची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने मी तयारी करीत आहे.

-राहुल आवारे

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply