पनवेल : रामप्रहर वृत्त
गजल सागर प्रतिष्ठान, मुंबई व गजल ग्रुप, पनवेलच्या वतीने तरही मुशायर्याचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले आहे. बी.एड् कॉलेज सभागृह, बस स्टॉपजवळ, पनवेल येथे रविवारी (दि. 25) सायंकाळी 4 वाजता होणारा हा तरही मुशायरा गजल चळवळीतील साथी गजलकार दिवंगत लक्ष्मण जेवणे यांच्या स्मरणार्थ होणार आहे. या तरही मुशायर्यासाठी ‘माझ्या घरी सुखांचा जेव्हा जमाव झाला’ ही लक्ष्मण जेवणे यांची ओळ देण्यात आलेली आहे.
‘तरही’ गजल ़हा गजलच्या विश्वातील गजलरचनेचा एक वैशिष्ट्यपूर्ण व मनभावन प्रकार. तरहीसाठी बुजुर्ग अथवा ख्यातनाम गजलकाराच्या गजलेची एक ओळ (मिसरा) संबंधित गजलकारांना दिली जाते. त्या मिसर्यानुसार इतर गजलकारांनी आपापली गजल लिहायची असते. या प्रकारात रचना कौशल्यासोबतच प्रतिभेचाही कस लागतो आणि रियाजसुद्धा होतो. ज्येष्ठ गजलकार व नवव्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाचे अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर या तरही मुशायर्याचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. त्याचबरोबर सेल्स टॅक्स विभागाचे उपायुक्त प्रमोद भोसले, ज्येष्ठ साहित्यिका मनीषा बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार व कवी दुर्गेश सोनार हे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. या वेळी ए. के. शेख यांच्या ‘गजल एके गजल’ या पुस्तकाची तिसरी आवृत्ती, संदीप बोडके यांच्या ‘उजळली सांजवेळ’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती, दिवाकर वैशंपायन यांचे ‘गजलवेलीवरील फुले’, तसेच ‘कौशल’ श्रीकांत पेटकर यांचे ‘कविता संदर्भ असलेल्या’ या चार पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या अनोख्या मुशायर्याला आणि पुस्तक प्रकाशनाला गजल रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गजल सागर प्रतिष्ठानचे गजलनवाज भीमराव पांचाळे व गजल ग्रुपचे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख, रोहिदास पोटे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper