आरोपींवर कठोर कारवाई करावी, माणगाव पोलिसांना निवेदन
माणगाव : प्रतिनिधी
गोवंश हत्या करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या गोवंश हत्या करणार्या आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी व अशा घटनांना आळा घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी शुक्रवारी (दि. 20) माणगाव पोलीस ठाण्याला निवेदनाद्वारे दिला.
भाजपचे माणगाव शहराध्यक्ष राजू मुंडे यांच्या लेटरहेडवर असलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, 18 ऑगस्ट रोजी गोवंश मासाची चोरटी वाहतूक करणार्या चार आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एक आरोपी शमीम उर्फ पप्पन कुरेशी यांच्यावर या पूर्वीही देवनार, शिवाजीनगर, मुंबई व माणगाव येथे प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. राज्यात प्राणी हत्याबंदी कायदा लागू असताना रायगड जिह्यात मागील काही महिन्यापासून प्राण्याची अवैधरित्या कत्तल व मासाची चोरटी वाहतूक या प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. अशा गुन्ह्यातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी.
माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांना शुक्रवारी हे निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा प्राजक्ता शुक्ल, तालुका सरचिटणीस योगेश सुळे, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय मोने, निजामपूर विभाग अध्यक्ष गोविंद कासार, संजय जाधव, बाबुराव चव्हाण, अशोक यादव यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
गोवंश हत्याप्रकारच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. माणगाव – मोर्बा रस्त्यावरून गोवंश मासाची चोरटी वाहतूक करणार्या चार आरोपींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
-योगेश सुळे, सरचिटणीस, माणगाव तालुका भाजप