श्रीवर्धन : प्रतिनिधी
देशातील अल्प व अत्यल्प भूधारकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ श्रीवर्धन तालुक्यातील जास्तीत-जास्त पात्र शेतकर्यांना मिळावा, यासाठी संबंधीतांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन तहसीदार जयराज सूर्यवंशी यांनी येथे केले.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेविषयी माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत तहसीदार सूर्यवंशी उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. श्रीवर्धन तालुक्यातील कृषी व पंचायत समिती कार्यालयाचे कर्मचारी ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, महाईसेवा केंद्र संचालक या सभेला उपस्थित होते. दोन-तीन दिवसात शेतकर्यांचे शिबिर घेऊन त्यांना या योजनेची माहिती द्यावी, अशी सूचना जयराज सूर्यवंशी यांनी
यावेळी केली. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकर्यांनी सामायिक सुविधा केंद्र या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची असून, त्यासाठी कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही. या नोंदणीसाठी आधारकार्ड, बॅक पासबुक, मोबाईल नंबर आदी कागदपत्रे आवश्यक आहेत, अशी माहिती तहसिलदारांनी दिली.
-प्रधानमंत्री किसान मानधन योजना
ज्या शेतकर्यांनी वृध्दावस्थेतील निर्वाहासाठी अत्यंत अल्पबचत केलेली असते किंवा कोणतीही बचत केलेली नसते आणि उत्पन्नाचा इतर स्त्रोत उपलब्ध नसतो अशा शेतकर्यांना त्यांच्या वृध्दापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे. 18 ते 40 वर्षे या वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेच्या नोंदणीसाठी पात्र राहतील. नोंदणीकृत शेतकर्याच्या दि. 1 ऑगस्ट 2019 रोजीच्या वयानुसार प्रतिमहा 55 ते 200 रुपयांचा हप्ता वयाचे 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावा लागणार आहे. शेतकर्याच्या हप्त्या इतकीच रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकर्याच्या पेन्शन फंडामध्ये जमा करणार आहे. पात्र लाभार्थीस वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानतंर प्रतिमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. लाभार्थी शेतकर्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयाना कुटुंब निवृतीवेतन मिळण्याचीसुध्दा या योजनेत तरतूद आहे.