आज करणार भाजपमध्ये प्रवेश
सातारा : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे उद्या (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्ली येथे एका जंगी सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजेंनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.
उदयनराजे भोसले यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्या (शनिवारी) भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे.
ट्विटरवर उदयनराजे भोसले यांनी पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहतील.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपत प्रवेश केल्याच्या दुसर्याच दिवशी म्हणजे 15 सप्टेंबर रोजी उदयनराजे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper