
कर्जत : बातमीदार
स्वच्छता अभियान राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाले असून या अभियानाने देशाचे नाव जगात पोहचविले आहे, त्यामुळे आपण कायमस्वरूपी स्वच्छतेवर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी येथे केले. मध्यरेल्वे प्रशासनाने 16 ते 30 सप्टेंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या वतीने आणि मध्य रेल्वेच्या सहकार्याने कर्जत रेल्वे स्थानक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नगरसेवक बळवंत घुमरे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे, नगरपालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे, असोसिएशनचे अध्यक्ष केतन शाह, कार्याध्यक्ष सुरेश खानविलकर, सदस्या शर्वरी कांबळे, रेल्वे स्थानक प्रबंधक हरिश्चंद्र, रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक सिंह आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कर्जत रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियानात प्रवाशांनी देखील भाग घेतला. अभिनव ज्ञानमंदिर प्रशाळेच्या इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान जनजागृतीबाबत प्रात्यक्षिके सादर केली.
स्वच्छता अभियान हा राष्ट्रीय उपक्रम असून, त्यात सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या घराबरोबरच आजुबाजूचा परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी
-विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत