भारतातील विविध भाषा, विविध पंथ, संप्रदाय, वेशभूषा यातून साकारणारी एकता हीच आमची वेगळी ओळख असून हे वैविध्य आणि लोकशाहीचे संस्कार सोबत घेऊनच अनेक वर्षे हा देश पुढे चालला आहे, असे प्रतिपादनही मोदींनी यावेळी केले.
गेली अनेक वर्षे महासत्ता म्हणून जगभरातील देशांवर वर्चस्व गाजवणार्या अमेरिकेतील ह्युस्टन शहर, तिथल्या स्टेडियममध्ये जमलेली 50 हजार मूळच्या भारतीय वंशाच्या लोकांची गर्दी आणि सभेला उपस्थित खास श्रोत्यांमध्ये दुसरे-तिसरे कुणी नाही तर थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प… अशा ऐतिहासिक सभेमध्ये देखील आपल्या अमोघ वक्तृत्वशैलीने समग्र उपस्थितांची मने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जिंकून घेतली. एका विदेशी नेत्याच्या त्याच्या विशिष्ट वंशाच्या लोकांसमोर होणार्या सभेला एखाद्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षाने उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुन्हा असे घडण्याची शक्यताही कमीच. अशा सभेत ‘हाउडी मोदी, हाउडी मोदी’ अशा अभिवादनाचा वारंवार सामुहिक पुकारा करणार्या मूळच्या भारतीय वंशाच्या गर्दीला मोदींनी आठ भारतीय भाषांमध्ये उत्तर दिले- ‘सारे काही छान चालले आहे’! मराठी, गुजराथीपासून थेट बंगाली, तामिळपर्यंत निरनिराळ्या भारतीय भाषांमधून बोलून थेट ती मातृभाषा असणार्या जनसमुदायाची मने तर
मोदींनी जिंकून घेतलीच. पण मोदींना गर्दीकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून चेहर्यावर कुतुहल-कौतुकमिश्रित स्मित उमटलेल्या ट्रम्प यांच्याकडे पाहून मोदी म्हणाले, माझ्या अमेरिकी मित्रांनो, मी फक्त एवढेच म्हणालो आहे की एव्हरीथिंग इज फाइन. या एका साध्याशा वाक्यातून मोदीजींनी दिलेला संदेश मात्र अनेक पदरी होता. काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर तेथील परिस्थितीबाबत, मानवी हक्क उल्लंघनांचे आरोप करून भारताबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोधी मत तयार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला गेला होता. एका परीने त्यालाही मोदींनी यातून प्रत्युत्तर दिले. भारतात सारे काही आलबेल आहे, असे सांगणार्या मोदींनी पुढे या सभेत पाकिस्तानला चांगलेच फैलावर घेतले ते वेगळेच. ज्यांना स्वत:चा देश सांभाळता येत नाही, त्यांनी भारतद्वेषाला केंद्रस्थानी ठेवले आहे, अशी बोचरी टीकाही मोदींनी यावेळी केली. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत 61 कोटी जनतेने आपल्या बाजूने कौल दिल्याचा उल्लेख मोदींनी केला, जो अर्थातच येत्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीला
सामोर्या जाणार्या ट्रम्प महाशयांच्या भिवया उंचावून गेला. 61 कोटी
मतदार ही खूप मोठी संख्या आहे, असे आपल्या भाषणात म्हणायला ट्रम्प विसरले नाहीत. दोन मोठ्या लोकशाही देशांच्या एकत्र येण्याचा मुद्दाच ट्रम्प यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी होता आणि हे दोन देश एकत्रितपणे कट्टर इस्लामी दहशतवादाचा सामना करतील या त्यांच्या प्रतिपादनाला उपस्थित गर्दीने उभे राहून समर्थन दर्शविले. ट्रम्प यांच्या प्रमाणेच मोदींच्या सभेकरिता आवर्जून उपस्थित राहिलेल्या अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाच्या अनेक प्रतिनिधींसाठी 50 हजार भारतीयांची ही गर्दी डोळे विस्फारणारी होती. यापैकी अनेक भारतीय हे अमेरिकेच्या कानाकोपर्यातून अर्थात निरनिराळ्या मतदारसंघांतून येथे आले होते. स्थलांतरितांच्या विरोधात भूमिका घेणारे अशी ओळख झालेल्या ट्रम्प यांच्याकरिता आगामी अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी या गर्दीला सामोरे जाणे गरजेचे होते. तो त्यांचा मूळ हेतू असला तरी भारत-अमेरिका मैत्रीचा त्यांनी वारंवार केलेला उच्चार भारताच्या दृष्टीने फायद्याचाच आहे.