Breaking News

नवरात्रोत्सवावर आचारसंहितेचे सावट

राजकीय जाहिरातदार घटले; मंडळांना आर्थिक चणचण

खोपोली : प्रतिनिधी

नवरात्रोत्सव मंडळांना राजकीय नेते व कार्यकर्ते दरवर्षी जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी देतात, मात्र यावर्षी आचारसंहितेमुळे जाहिरातींवर बंधने आल्याने राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी मंडळांना निधी देण्यास हात अखडता घेतला आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सव मंडळांसमोर आर्थिक चणचण निर्माण होत आहे. आगामी संपूर्ण नवरात्रोत्सव विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या सावटामध्ये सापडला आहे. आचारसंहिता नियमानुसार राजकीय पक्षांच्या जाहिराती करण्यावर बंधने आली आहेत. त्याचप्रमाणे इतर कार्यक्रम व दांडियाच्या वेळेवरही कडक बंधने टाकण्यात आल्याच्या सूचना पोलीस परवाना घेताना दिल्या जात आहेत. आचारसंहितेच्या नावाने पोलीस यंत्रणेकडून अतिरिक्त नियमांची मोठी यादी मंडळांना देण्यात येत आहे. नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठीच्या खर्चात यंदाही 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आचारसंहिता म्हणून कडक नियमांची अंमलबजावणी, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी, राजकीय नेते व कार्यकर्त्यांकडून निधी मिळण्यातील अडचणी अशा कात्रीत बहुतेक सर्व सार्वजनिक नवरात्र मंडळे सापडली आहेत.

दरवर्षी आमच्या मंडळाला विविध लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांकडून जाहिरातींच्या माध्यमातून उत्तम प्रकारे निधी मिळतो, मात्र यावर्षी आचारसंहितेमुळे जाहिरात किंवा फलके लावता येणार नसल्यामुळे नियमितपणे निधी देणार्‍यांनीही हात अखडता घेतल्याने खर्च भागविण्यासाठी आम्हा सदस्यांनाच अतिरिक्त काँट्रिब्युशन काढावे लागण्याची वेळ येणार आहे.

-मिलिंद चव्हाण, खजिनदार, नवरात्र मंडळ खोपोली

आचारसंहिता लागू असल्याने त्या दृष्टीने नियम काटेकोर पाळण्याची जबाबदारी त्या त्या नवरात्रोत्सव मंडळाची आहे. आचारसंहिता व त्याची अंमलबजावणी याबाबतची माहिती देण्यासाठी सर्व नवरात्र मंडळ पदाधिकार्‍यांची विशेष बैठक घेण्यात येणार असून, त्यात आचारसंहितेबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.

-धनाजी क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, खोपोली

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply