Breaking News

पनवेल वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात शुक्रवारी (दि. 17) पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि व्यापारी यांची बैठक घेण्यात आली. या वेळी सूचविण्यात आलेले उपाय प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस राबविण्याचे ठरले आहे. याशिवाय पोलीस, आरटीओ, महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी संयुक्त पाहणी करून आठवडाभरात आपला अहवाल सादर करणार आहेत.
पनवेल शहरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत व्यापारी, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सतत मागणी होत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी महापालिकेत बैठक बोलावली होती. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अ‍ॅड. मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, राजू सोनी, अजय बहिरा, मुकीद काझी, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रूचिता लोंढे, महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे, वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक नाळे, मोबिलिटी सल्लागार क्रिसील कंपनीचे प्रतिनिधी आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी मोबिलिटी सल्लागार क्रिसील कंपनीच्या प्रतिनिधीने त्यांच्या सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. व्यापारी प्रतिनिधींनी बाहेरून येणार्‍या मोठ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होते, पण लहान गाड्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे इलाज नसतो.
कामगार उपलब्ध होऊ शकत नसल्याने रात्री किंवा दुपारी माल उतरवणे व्यवहार्य नसल्याचे सांगितले. पनवेलमध्ये 76 रिक्षा स्टॅण्ड असताना त्याऐवजी नाक्यावर कशाही रिक्षा उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगून महापालिका, पोलीस आणि आरटीओ यांनी एकत्र पाहणी करून निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. लाईन आळीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या उभ्या असतात. त्यांच्यावर कारवाईची मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली. नवीन पनवेलमध्ये मोठ्या बस उभ्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी सांगितले. कोर्टाच्या गेटवर रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाद निर्माण होतात. तो स्टॅण्ड हलवणे, याशिवाय नवीन पनवेलमध्ये रेल्वेस्थानकानजीकच्या बिकानेरपाशी मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे अनेकवेळा भांडणे होत असतात. याबाबत कारवाईची मागणी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केली.
या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे म्हणाले की, टपाल नाका ते पंचरत्न नाका प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करावा ही सूचना चांगली आहे. शहरातील रोटरी व आयलंड महापालिकेने तत्काळ काढून टाकावे. रस्त्यावरील फेरीवाल्यांची वाईट अवस्था आहे. त्यांना हटवले पाहिजे. प्रत्येक दुकानदाराने एक पायरी पुढे आणली आहे. त्यामुळे एका मोटरसायकलची जागा अडते. या पायर्‍या महापालिकेने काढून टाकाव्यात. मोठ्या वाहनांना परवानगी देताना किती टनाच्या वाहनांना परवानगी द्यावी हे ठरवावे लागेल. याशिवाय रिक्षा स्टॅण्डबाबतही निर्णय घेणे गरजेचे आहे. महापालिकेने कायमस्वरूपी यंत्रणा उभारून रस्त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवल्यास वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण कमी होईल. पनवेलमधील क्राईम रेट जास्त असल्याने बाजारात सीसीटीव्ही महापालिकेने लावणे फार गरजेचे आहे.

पनवेल शहराचा नवीन प्लॅन बनवताना दूरचा विचार करीत असताना एपीएमसी शहराच्या बाहेर नेली तर काय होईल किंवा आता आहे तिथेच राहिली तर वाहतूक कंट्रोल करण्यासाठी ज्या रस्त्यावर घाऊक व्यापार्‍यांची दुकाने आहेत तेथे मोठ्या गाड्यांना परवानगी देताना कशा प्रकारे द्यावी. एमजी रोड, उरण नाका ते टपाल नाका रस्ता, कर्मवीर भाऊराव पाटील रस्ता, उरण नाका ते भाऊ जगनाडे रस्ता, उरण नाका ते एपीएमसी मार्केट रस्ता या रस्त्यांवर घाऊक व्यापार्‍यांची दुकाने असल्याने मोठी वाहने येणारच. या सर्वांचा अभ्यास सल्लागार एजन्सीने करणे महत्त्वाचे आहे. वाहने पार्किंगसाठी व्यवस्था ही प्लॅनिंगमध्ये करणे आवश्यक आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल महापालिका क्षेत्र हे नवीन पनवेल, खांदा कॉलनी, खारघर, कामोठे, कळंबोली अशा अनेक नोडचे मिळून झाले आहे. महापालिका क्षेत्रातील छोट्या रस्त्यांचा वाहतूक शाखा आणि शहर पोलीस एका आठवड्यात सर्वे करतील.
लोकप्रतिनिधी व व्यापार्‍यांना बोलावून तिथेच चर्चा करून एकेरी मार्गाचा निर्णय घेऊ.
अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply