कर्जत शहरात नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच
काँग्रेसविरहित म्हणजे शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आली आहे. सेना-भाजपबरोबर असलेल्या आरपीआय आठवले गटाने यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहून सत्ता राबविली आहे, पण आता पूर्णपणे काँग्रेसविरहित सत्ता कर्जत शहरात आली असून कर्जत शहरवासीयांना हक्काचे व्यासपीठ यानिमित्ताने मिळाले आहे. कर्जत शहरात केवळ रस्ते झाले पण कर्जत शहरात राहणार्या नागरिकांना सुविधा मिळाल्या नाहीत.त्या देण्यासाठी राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्या युती सरकारने शब्द दिला आहे. त्याचवेळी ही सत्ता आणण्यात ज्यांनी गेली दोन वर्षे शहरात फिरून शहराचे नियोजन कसे असले पाहिजे यासाठी विचारविनिमय केला आणि स्वतः शहराचे नियोजन कसे असावे यासाठी व्हिजन तयार केले, त्या थेट नगराध्यक्षा म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या आहेत. त्या सुवर्णा जोशी यांच्यामुळे कर्जत शहरवासीयांना विकासाची नवी चाहूल लागली आहे.
पोलीस पाटलाची नात म्हणून घरातून बाळकडू घेऊन पुढे लग्न होऊन कर्जतमध्ये आल्यानंतर सासरे अनंतकाका जोशी यांचे कर्जत शहराचे व्हिजन समजून घेतले आणि पाच वर्षांपूर्वी निवडणूक लढविली आणि जिंकली, पण तेवढ्यावर थांबायचे नव्हते आणि म्हणून शहराचे कर्ते व्हायला हवे यासाठी निश्चय केला आणि नागरिकांची अपूर्व साथ मिळवत सुवर्णा जोशी या कर्जतच्या थेट नगराध्यक्षा बनल्या आहेत. त्यावेळी माझ्या आजोबांकडे घराच्या ओटीवर बसून गावातील सोडले जाणारे प्रश्न यांचा अभ्यास करून मतदारांना सामोरे गेले. त्यावेळी आपण ज्या प्रभागातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे, ते प्रश्न समजून घेतल्याने लोकांत मिसळून राहिल्याने मला मतदारांनी कर्जत शहरात सर्वाधिक मतांनी निवडून दिले. मग मागे वळून पाहिले नाही आणि पाच वर्षांत विरोधी पक्षात असतानादेखील सर्वाधिक प्रश्न विचारले. त्यातून अनेकांचे प्रश्न सुटले आहेत. त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर मला आत्मविश्वास मिळाला आणि हा आत्मविश्वास मला शहराची सेवा करण्यासाठी जनतेचा मिळाल्याचा दावा आपल्या कामातून यशस्वी करण्याचे उद्दिष्ट घेऊन महायुती कर्जत शहराची घडी बसवण्यासाठी सज्ज आहे.
त्यातील एक अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून सांगायला हवा. कारण विज्ञान शाखेची पदवीधर असल्याने डासांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आजारी होणारे लोक मला फोन करायचे. त्यावेळी आपण त्या ठिकाणी जाऊन प्रश्न समजून घ्यायचे आणि त्यावर तत्काळ उत्तरे शोधायची. त्यामुळे आजही कोणाकडे डेंग्यूचे रुग्ण आढळले तर मला फोन येतो. त्यासाठी शहरात असलेली गटारे बंदिस्त झाली पाहिजेत आणि भुयारी गटार योजना कर्जतमध्ये आणणे आपले पहिले लक्ष्य असणार आहे. दुसरीकडे आम्ही कर्जत नगरपालिकेत विरोधी पक्षात होतो, पण राज्य सरकार तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला भरभरून निधी देण्याचे काम केले. आता एवढ्यावर थांबून चालणार नाही तर शहरात 50 टक्के महिला राहतात. त्यांच्या समस्या कोणी समजून घेत नाहीत, मात्र आपण एक महिला असल्याने कर्जत शहरात आता सार्वजनिक शौचालये खास महिलांसाठीदेखील असावीत या मताच्या आपण आहोत. त्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन फक्त महिलांसाठी स्वच्छतागृह आणि शौचालये ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न कर्जत नगरपालिका करणार आहे. शहरातील गटारे सांडपाणी वाहून नेताना उघडी नसावीत यासाठी पालिकेचा पहिला प्रयत्न राहणार असून साथीचे आजार शहरात येणार नाहीत याची काळजी नगरपालिकेला घ्यावी लागणार आहे. कारण आरोग्य सुस्थितीत तर सर्व काही या रीतीप्रमाणे शहरात नागरिकांची काळजी घेण्यासाठी एक स्वतंत्र विभाग कार्यरत राहणार आहे.
कर्जत शहरात असलेल्या उल्हास नदीचे संवर्धन व्हावे यासाठी आम्ही गावासाठी आमचे पहिले व्हिजन ठेवलेल्या स्मशानभूमीचा होणारा कायापालट जसा होत आहे, त्याच धर्तीवर आमचे उल्हास नदीचे संवर्धन करण्याचे व्हिजन तयार आहे. त्यावेळी आम्ही सर्व समस्या आणि प्रश्न हे महायुती म्हणून समोर आणले आहेत. आम्हाला आता स्थानिक पातळीवर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदार यांचे सहकार्य लाभत असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत युतीची सत्ता आहे. तेवढ्यावरच भागून जमणार नाही तर कर्जत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी व्हिजन घेऊन काम करीत आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा असाही आमचा पाठपुरावा खासदार बारणे यांच्याकडे सुरू आहे. मुख्यतः कर्जत शहराचा विकास होत असताना गुंडगे आणि भिसेगावकडे पहिली 20 वर्षे पालिकेने सावत्र म्हणूनच पाहिले आहे. त्यामुळे विकासाच्या मार्गावर या भागाला आणण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी कर्जत शहर आणि गुंडगे तसेच भिसेगाव डोंगरी जोडले जावेत यासाठी महायुती प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. त्यात स्कायवॉकने गुंडगे आणि भिसेगाव जोडले जाऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करण्याचे धोरण महायुतीने ठरवले आहे.
कर्जत शहरातील नगरपालिकेचा भाग असलेल्या गुंडगे भागात जाण्यासाठी दीडशे रुपये मोजावे लागतात. ही समस्या दूर करावी, अशी त्या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण करावी लागणार आहे. रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करणारे गुंडगे आणि भिसेगाव भागातील लोक शिवसेना-भाजप-
आरपीआयकडून विकासाची अपेक्षा करून आहेत. त्यासाठी भुयारी मार्गाचा पर्यायदेखील विचाराधिन असून, तीन चाकी आणि हलकी वाहने जाण्यासाठी ते मार्ग असावेत या मताचे गुंडगे आणि भिसेगाव ग्रामस्थ असून, त्याचा विचार केला जाणार आहे.
स्कायवॉक करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पालकमंत्री यांच्या माध्यमातून जात आहोत. कर्जतला कलावंत, खेळाडू यांची मोठी पार्श्वभूमी आहे. त्या सर्वांचे स्मरण व्हावे असे दालन उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याचवेळी नाट्य कलावंत यांची परंपरा असलेल्या शहरात नाट्यगृह नाही. ही बाबदेखील भूषणावह नाही. त्यामुळे नाट्यगृह व्हावे, सर्व सोयींयुक्त अशी क्रीडांगणे व्हावीत यासाठी आमचे व्हिजन तयार आहे. मासळी मार्केट तसेच भाजी मार्केट आणि शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आमच्याकडे व्हिजन आहे.
हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आपण सर्वसामान्यांपासून सर्वांचे ऐकून घेऊ, मात्र प्रत्येक निर्णय आपल्या मनातून घेतलेला असेल. कारण आपण थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलो आहोत ते पाच वर्षे सेवा केली म्हणून.त्याचवेळी पाच वर्षे आपल्या कामातून जनतेला विश्वास वाटला आणि त्यांनी हा विश्वासदेखील आपल्याला दिला आहे. त्यामुळे शहराला आणखी वरच्या यादीत आणण्यासाठी व्हिजन घेऊन मैदानात उतरली आहे. ते व्हिजन यशस्वी करायचे आहे, पण या सर्व प्रक्रियेत कर्जत शहरातील सामान्य नागरिक असला पाहिजे यासाठी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी थेट जनतेशी संवाद साधणार आहेत.
त्यासाठी त्यांनी एक पत्रपेटी पालिकेच्या कार्यालयाबाहेर लावली आहे. त्या पत्रपेटीची चावी स्वतः नगराध्यक्षांकडे असून शहरातील सामान्य नागरिक आपली समस्या आणि शहराच्या विकासाबाबत सूचना चिठ्ठीतून करू शकतात. त्या सूचनांवर तीन दिवसांत निर्णय घेण्याचे धोरण नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि उपनगराध्यक्ष भाजपचे अशोक ओसवाल यांनी निश्चित केले आहे. पालिकेच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेली भगवी पत्रपेटी कर्जतकर नागरिक यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ बनली आहे. कारण थेट नगराध्यक्ष यांना जाऊन भेटताना अनेकांना सामोरे जाण्यापेक्षा आपले म्हणणे चिठ्ठीतून दिल्यास त्याबाबत नगराध्यक्षा सुशिक्षित आणि प्रश्नांची जाण असणार्या असल्याने निर्णय होतील अशी खात्री आणि अपेक्षादेखील कर्जतकरांना या शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीच्या माध्यमातून निर्माण झाली आहे.
-संतोष पेरणे (खबरबात)