Breaking News

‘दिबां’च्या नावासाठी 10 जूनला मानवी साखळी आंदोलन; विविध संघटनांचा वाढता पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी येत्या 10 जूनला मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासंदर्भात पनवेल येथील आगरी समाज मंडळाच्या सभागृहात गुरुवारी (दि. 3) सायंकाळी आढावा बैठक झाली. या वेळी लढ्यातील रक्तरंजित झेंड्याचे अनावरण करण्यात आले, तर या बैठकीत भारत मुक्ती मोर्चा व त्यांच्या संलग्न 68 संघटनांनी आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी उभारण्यात येत असलेल्या लढ्याला रायगडपासून मुंबईपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या अनुषंगाने शहरात, गावांमध्ये विभागनिहाय बैठका होत आहे. या बैठकांमधून आंदोलनाची तीव्रता स्पष्ट दिसून येत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून 10 जूनला मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीस लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जे. डी. तांडेल, कॉ. भूषण पाटील, दीपक म्हात्रे, भाजपचे राजेंद्र पाटील, राजेश गायकर, दशरथ भगत, अ‍ॅड. मदन गोवारी, गुलाब वझे, संतोष केणे, कामगार नेते सुरेश पाटील, शेकापचे मेघनाथ तांडेल यांच्यासह रायगड, नवी मुंबई, ठाणे, मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव असावे, अशी भावना रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर, मुंबईतील भूमिपुत्र व्यक्त करीत आहेत, तर विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा घाट राज्य सरकार स्तरावर घातला जात आहे, मात्र ‘दिबां’चे नाव देण्यासाठी रायगडपासून मुंबईपर्यंत लोक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नावाला समर्थन देण्यासाठी चळवळ उभारली जात आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त आणि संघटना एकत्र आल्याने हा लढा आता व्यापक होत आहे. येत्या 10 जूनला रायगड, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पालघर, अंबरनाथ, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, मुंबई या ठिकाणी मानवी साखळी तयार करून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या आंदोलनानंतर 24 जूनला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी हा लढा अधिक व्यापक करून सिडको भवनाला घेराव घालण्यात येणार आहे. त्याचीही तयारी या बैठकीतून पहायला मिळाली. 

कामोठे ग्रामस्थांकडून समर्पण निधी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाला कामोठ्यातील 364 कुटुंबांनी प्रत्येकी एक हजार रुपये या प्रमाणे तीन लाख 64 हजार रुपये जमा करून समर्पण निधी दिला आहे. कामोठे ग्रामस्थांनी केंद्रीय कृती समितीस हा धनादेश सुपूर्द केला. या मागील उद्दिष्ट सांगताना कामोठे ग्रामस्थ पंच कमिटीने या वेळी सांगितले की, गावातील ज्या 364 कुटूंबांनी 70च्या दशकात लोकवर्गणी जमा करून व स्वतः श्रमदान करून आपल्या लाडक्या लोकनेत्यास अर्थात दि. बा. पाटील यांना त्यांचे घर बांधून दिले होते त्याच 364 कुटूंबांनी आजही ‘दिबां’वरील प्रेम व्यक्त करताना घरटी एक हजार समर्पण निधी या आंदोलनास दिला आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply