Breaking News

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या तयारीवर एक दृष्टीक्षेप.

-एकूण मतदार

महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण आठ कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार चार कोटी  68 लाख 75 हजार 750, महिला मतदार चार कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार दोन हजार 634, दिव्यांग मतदार तीन लाख 96 हजार आणि सर्व्हिस मतदार एक लाख 17 हजार 581 यांचा समावेश आहे.

-जनजागृतीसाठी सदिच्छादूत

मतदार जागृतीच्या मोहिमेत सदिच्छादूत म्हणून अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ.निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.

 -मतदान केंद्र

विधानसभा निवडणूक 2019साठी 96 हजार 661 मतदान केंद्र आहेत. मुख्य मतदान केंद्र 95,473, सहायक मतदान केंद्र 1,188, खास महिलांसाठी महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 सखी मतदान केंद्रही स्थापन करण्यात आली आहेत.

मतदारांसाठी सोयीसुविधा

किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी पीडब्ल्यूडी ची सुविधा देण्यात आली आहे.

सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग, तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था, दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था आहे. अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रीत केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य होईल. लहान मुलांसह मतदानास येणार्‍या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.

-दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्राची रचना

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसर्‍या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत.

पहिल्या वा दुसर्‍या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी आहे, तिथे लिफ्टची व्यवस्था.

यंत्रणा तत्पर

विधानसभा निवडणुकीसाठी एक लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचादेखील समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका होण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

-अशी मिळवा मतदान केंद्राची माहिती

मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in

या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील वा पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

-मतदारांच्या सुविधेसाठी

आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील अ‍ॅपची सुविधा उपलब्ध.

ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाहतुक करणार्‍या वाहनांच्या नियंत्रणाकरिता जीपीएस ट्रॅकींग-पीपी, मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-1950.’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.

– मतदारांसाठी व्होटर हेल्पलाईन अ‍ॅपही सुरू.

दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी पीडब्ल्यूडी ची सुविधा.

-मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक.

भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.

1. पासपोर्ट (पारपत्र)

2. वाहन चालक परवाना

3 छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य, केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)

4. छायाचित्र असलेले बँकांचे, टपाल कार्यालयाचे पासबूक

5. पॅनकार्ड

6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड

7. मनरेगा जॉबकार्ड

8. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

9. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज

10. खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र

11. आधारकार्ड

– दिव्यांगांकडून होणार 106 मतदार केंद्रांचे संचालन

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 106 मतदान केंद्र ही दिव्यांगांद्वारे संनियंत्रित केली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक आठ मतदान केंद्र ही लातूर शहर मतदारसंघातील असून, त्या खालोखाल उदगीर मतदारसंघात सहा मतदान केंद्र ही दिव्यांग संचालित असतील. निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तिंना निवडणूकविषयक कामे देऊ नये, असे निर्देश दिले असले तरी दिव्यांग व्यक्ती सक्षमपणे सर्व कामे करू शकतात ही बाब सिद्ध करण्यासाठी निवडणूकविषयक कामात त्यांना सहभागी करून घेतले जात आहे.

-विद्यार्थ्यांचे सहाय्य

मतदान केंद्रांवर वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना त्यांच्या शारिरीक मर्यादा वा विकलांगतेमुळे मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान करण्यात अडथळे येऊ नये, त्यांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी प्रत्येक केंद्रावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

शाळा, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी), नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईडचे विद्यार्थी यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबरोबरच नागरी संरक्षण विभाग, आपत्त्कालीन परिस्थितीत काम करणारे स्वयंसेवक व गृहरक्षक दल यांची मदतनीस-स्वयंसेवक म्हणून निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावर दिव्यांग आल्यानंतर त्यांच्या वाहनापासून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत त्या वाहनापर्यंत पोचविण्याची जबाबदारी हे स्वयंसेवक बजावतील. मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून देणे, पाणी, गरज भासल्यास प्रसाधनगृह व प्रथमोपचार यांची उपलब्धता करून देण्याचे काम हे स्वयंसेवक करतील. या अनुषंगाने या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

-तीन लाखांहून अधिक सुरक्षा जवान तैनात

विधानसभा निवडणूक शांततेत होण्यासाठी राज्य आणि केंद्राचे पोलीस दल सुसज्ज झाले असून, सुमारे तीन लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. तीन हेलिकॉप्टर व ड्रोन तैनात करण्यात आले आहेत.

मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, सर्व प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी राज्य पोलीस दलातील दोन लाख पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, नागालँडचे महिला पोलीस दल आदी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 350 कंपन्या (प्रत्येक कंपनीत शंभर अधिकारी-जवानांचा समावेश), राज्य राखीव पोलीस दलाच्या 100 कंपन्या, राज्य गृहरक्षक दलाचे 45 हजार जवान अहोरात्र तैनात करण्यात आल्या आहेत. याबरोबरच इतर राज्यातील सुमारे 20 हजार गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात आली आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply