सहकार आयुक्तांची आरबीआयला शिफारस
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी अंतरिम अहवालाच्या आधारे कायदेशीर कारवाई करावी, अशी शिफारस सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) उपमहाव्यवस्थापक संजय कुमार यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी सहकार आयुक्त सतीश सोनी, तसेच मुंबई विभागीय आरबीआय अधिकारी उमा शंकर यांचे या प्रकरणी लक्ष वेधले होते.
कर्नाळा बँक गैरव्यवहारप्रकरणी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, त्यात अनेक सर्वसामान्य ठेवीदार, संस्था भरडल्या गेल्या आहेत. यासंदर्भात सहकारी संस्था रायगडचे विशेष लेखापरीक्षक यू. जी. तुपे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 अन्वये कर्नाळा बँकेच्या विशेष लेखापरीक्षणाचे काम हाती घेतले. त्यांनी आपला अंतरिम अहवाल सहकार आयुक्त सतीश सोनी यांना सादर केला आहे. हा अहवाल सोनी यांनी आरबीआयचे उपमहाव्यवस्थापक संजय कुमार यांच्याकडे कारवाईसाठी पाठवला आहे. दुसरीकडे आरबीआयने केलेल्या तपासणीतही कर्नाळा बँकेची अत्यंत भ्रष्ट आणि काळी बाजू उघड झाली आहे.
कर्नाळा बँक घोटाळ्यातील दोषींवर आता कारवाई अटळ आहे. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी आरबीआयचे उपमहाव्यवस्थापक संजय कुमार यांना याबाबत शिफारस केली. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदार, संस्था, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायतींना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper