खोपोली : खंडाळा घाटातील अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू व 30 जण जखमी, मंगळवारच्या अपघातात तिघे जखमी या घटना ताज्या असतानाच बुधवारीही
(दि. 6) संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास प्रवासी असलेल्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यात टेम्पोमधील सात जण, दुचाकीवरील दोघे आणि कारमधील तिघे असे एकूण 12 जण जखमी झाले आहेत. यातील सात जण अतिगंभीर असून, त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर व अन्य भागातील मित्र परिवार कार्ला येथे एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करीत होते. त्यांचा टेम्पो (एमएच 04-जेके 4940) सायमाळजवळील तीव्र उतारावर आला असता, त्याचे ब्रेक निकामी होऊन तो अनियंत्रित झाला. या टेम्पोने प्रथम एक दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर तो उलटून खोपोली बाजूकडून येणार्या कारवरही आदळला.
जखमींमध्ये टेम्पोतील श्वेता देशमुख, अभिषेक देशमुख, जयश्री मढवी (सर्व राहणार उल्हासनगर), सुचिता गाडे, स्वाती जाधव, रोशनी जाडे (सर्व मुंबई), प्रथमेश काटकर (ठाणे), कारमधील गोविंद सकपाळ राव, पत्नी भाविका (उमरखाडी, मुंबई) आणि दुचाकीवरील अनिस शेख व इरफान शेख (खोपोली) यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच खोपोलीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी पोहचून त्यांनी महामार्ग पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमींना आधी खोपोली नगर परिषद रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अतिगंभीर असलेल्या सात जणांना तातडीने एमजीएम हास्पिटल येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.