Breaking News

खालापुरातील बोंबल्या विठोबाच्या यात्रेची लगबग

खालापूर : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील खोपोली-पेण रस्त्याला लागूनच ताकई येथे धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरातील यात्रेस येत्या कार्तिकी एकादशी म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ करुन यात्रेसाठीचे नियोजन जोरदार सुरू आहे. सलग 15 दिवस चालणार्‍या या यात्रेत संपूर्ण रायगड, ठाणेसह मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील लाखो भाविक भेट देऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. खोपोली-शिळफाट्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर श्री विठोबा-रुक्मिणीचे सुंदर मंदिर आहे. 15 दिवस भरणार्‍या यात्रेची ओळख बोंबल्या विठोबाची यात्रा म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. या ठिकाणी सुकी मच्छी, बैलबाजार व जिलेबी विक्रीचा मोठा व्यवसाय सुरू असतो. संत शिरोमणी तुकाराम महाराज मिरचीचा व्यापार करण्यासाठी या ठिकाणी आले होते. मिरच्या घेतल्यानंतर त्याची रक्कम त्यांना मिळाली नाही. अखेर तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या नावाने बोंबा मारल्या तेव्हा विठ्ठलाने सेवकाच्या रुपात येवून सर्व पैसे वसूल करुन दिले, अशी आख्यायिका येथील ग्रामस्थ सांगतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या यात्रेत होत असल्याने 15 दिवस स्थानिक ग्रामस्थांना मोठा रोजगार मिळतो. कपडे, भांडी, घोंगडी, मिठाई, बैलबाजार व सर्वात मोठा सुक्या मासळीचा बाजार येथे भरतो. मौत-का-कुआ, उंच आकाश पाळणेसह विविध मनोरंजनाचे अनेक प्रकार येथे पहायला मिळतात. ताकई देवस्थान समिती व खोपोली नगर परिषद संयुक्तरित्या यात्रेचे नियोजन करते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी  पहाटे 4 वाजता महापूजा केल्यानंतर, यात्रा व दर्शनाला सुरुवात होणार आहे. एकादशीच्या दिवशी व यात्रेच्या पहिल्या दिवशी खोपोली व खालापूर, पेण, कर्जत परिसरातून अनेक दिंड्या मंदिरात येतात.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply