लोकसभा निवडणुकीत खर्च केले 820 कोटी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसने यंदाच्या लोकसभा आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 820 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. आंध्र प्रदेश, तेलंगण, अरुणाचल प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम या राज्यांची विधानसभा निवडणूक लोकसभेच्या बरोबरीने झाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जितकी रक्कम खर्च केली त्यापेक्षा जास्त खर्च त्यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत केला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 714 कोटी खर्च केले होते. 31 ऑक्टोंबरला काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे निवडणूक खर्चाची माहिती सादर केली. काँग्रेसने 626.3 कोटी प्रचारावर, तर उमेदवारांवर 193.9 कोटी रुपये खर्च केले. अन्य पक्षांनी निवडणूक खर्चाची जी माहिती दिलीय त्यानुसार लोकसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसने 83.6 कोटी, बसपने 55.4 कोटी, राष्ट्रवादीने 72.3 कोटी आणि सीपीएमने 73.1 लाख खर्च केले. आमच्याकडे पैसे नाहीत असे काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदन यांनी मे महिन्यात वक्तव्य केले होते, मात्र 2019मध्ये काँग्रेसने प्रचारावर 626.36 कोटी खर्च केले. 573 कोटी चेकने तर 14.33 कोटी रोख रक्कमेच्या स्वरुपात दिले. केंद्रीय पक्ष मुख्यालयाकडून मीडिया प्रसिद्धी आणि जाहीरातीवर 356 कोटी रुपये खर्च केले. पोस्टर्स आणि निवडणूक साहित्यावर 47 कोटी रुपये खर्च केले. स्टार कॅम्पेनरच्या प्रवास खर्चावर 86.82 कोटी रुपये खर्च केले. काँग्रेसने छत्तीसगड आणि ओडिशामध्ये 40 कोटी, उत्तर प्रदेशात 36 कोटी आणि महाराष्ट्रात 18 कोटी रुपये खर्च केले. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने 15 कोटी आणि केरळमध्ये 13 कोटी खर्च केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper