पनवेल : वार्ताहर
विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पनवेल महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांची डागडुजी, तसेच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. या अंतर्गत उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने व प्रत्यक्ष उभे राहून प्रभागातील महाराणा प्रताप रोड (परदेशी आळी) येथील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेगाने सुरुवात केली.
येथील रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर दुसरा लेअर (डीबीएम) मारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर अंतिम बीसी हा लेअर मारण्यात येईल. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करताना रस्त्याच्या खाली गेलेल्या चेंबरची झाकणे वर उचलून घेतली जातील व जुनी काँक्रिटची झाकणे बदलून नवीन एफआरपी मटेरियलची झाकणे रस्त्याच्याच लेवलला बसविण्यात येणार आहेत. ही सर्व कामे येत्या तीन दिवसांत पूर्ण होतील, असा विश्वास उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.