जागा आहे, पण मागणी प्रस्ताव नाही
म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा पोलीस अनेक सोयीसवलतींपासून वंचित आहेत. पोलीस ठाणे आणि कर्मचारी निवासस्थानासाठी म्हसळा नगरपंचायत हद्दीत 44 गुंठे जागा आरक्षित आहे. या जागेवर पोलीस ठाण्याची इमारत उभारण्यासाठीचा प्रस्ताव 2013ला पाठविण्यात आला, मात्र अद्यापही या राखीव जागेवर ना पोलीस ठाण्याची इमारत ना कर्मचार्यांना निवासस्थाने अशी स्थिती आहे. पूर्वी खामगाव येथे 17 गुंठे जागेत पोलीस आऊट-पोस्ट, पाच कर्मचार्यांना लागणारी निवासस्थाने, लॉकअप, पटांगण अशा सुविधा होत्या, मात्र आता तेथे केवळ पडीक इमारत उरली आहे. म्हसळा पोलीस निरीक्षकांपासून अधीक्षकांपर्यंत या जागा पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. म्हसळा शहराच्या मध्यवर्ती एसटी स्टँडसमोरील 21 गुंठे जागेवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून पोलिसांसाठी 14 खोल्यांची चाळ होती. 2013-14दरम्यान तिची केवळ दुरुस्ती केली. सध्या ती जागा पूर्णपणे बेवारस स्थितीत आहे. तेथील निवासस्थाने राहण्यास आयोग्य आहेत. त्यामध्ये कोणीही कर्मचारी राहत नसल्याचे सांगण्यात आले. म्हसळा नवानगर (पाण्याच्या टाकीजवळ) येथे अधिकार्यांसाठी स्वतंत्र बंगला व कर्मचार्यांसाठी आठ फ्लॅटचे बांधकाम 1997-98मध्ये करण्यात आले होते. या इमारतीचा वापर पोलीस खात्याने केवळ 14 वर्षे केला. आज संबंधित इमारत वापरण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात येते.