पनवेल ः रामप्रहर वृत्त
गेल्या वीस वर्षांपासून नेत्रविकार क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणार्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई ज्वेल्स, वाशी यांच्या पुढाकाराने व टाटा इंटरप्राइझेस पुरस्कृत रॅलीज इंडिया लिमिटेड तसेच आयसीआयसी आय लोम्बार्डच्या सहकार्याने 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान मोफत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये महाड, खेड, वळवली, करंजाडे, बारवई, भिंगारवाडी, पोयंजे, खांदा कॉलनी येथील जिल्हा परिषदेतील तसेच खाजगी शाळांमध्ये अठराशे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये जन्मजात असलेल्या नेत्रविकारांवर योग्य उपचारांचा अभाव, नेत्रविकार तज्ञाकडून वार्षिक तपासणी न झाल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. या शिबीरात तपासणी झालेल्या 20 टक्के मुलांमध्ये तिरळेपणा, जन्मजात डोळ्यांचे विकार, फळ्यावरचे कमी दिसणे अशा समस्या आढळून आल्या आहेत. ज्या मुलांना चष्माचा नंबर आला आहे अशा मुलांना मोफत चष्मे सुद्धा देण्यात येणार आहे.
मूल जन्माला आले की, काही दिवसांनी आपल्या आजूबाजूचे जग न्याहाळू लागते; पण काही वेळा जन्मजात किंवा वाढीच्या काळात डोळ्यांमध्ये काही समस्या निर्माण होताना दिसतात. दृष्टी मंदावणे ही त्यापैकीच एक समस्या असून या आजारापासून बचाव करण्यासाठी शाळेत जाण्याच्या वयात मुलांची नियमित तपासणी करून घेणं फार महत्वाचे असते. मुलांच्या डोळ्यामध्ये प्रकाशकिरणे सरळपणे जाताहेत की नाही, दोन्ही डोळ्यांची दृष्टी समान आहे का आणि दोन्ही डोळे एकसारखे सामान्य रूपात हालचाल करताहेत की नाही, या गोष्टी समजून येतात. यापैकी कोणत्याही पायरीवर काही समस्या असेल, तर वेळ न दवडता उपचार सुरू केले पाहिजेत, अशी माहिती या शिबिरादरम्यान लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात आली.