नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ पनवेलकर एकवटले
पनवेल : रामप्रहर वृत्त
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सिटीझनशीप अॅमेंडमेंट अॅक्ट-सीएए) समर्थनार्थ शनिवार (दि. 21) सायंकाळी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने एकटवले. त्यांनी जोरदार घोषणा देऊन या कायद्याचे समर्थन केले.
धर्म, प्रांत या आधारावर देशात फूट पाडण्याचा समाजकंटकांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी आणि देशाच्या एकतेला बळ देण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि विविध सामाजिक संस्थांनी नागरिकांना एकत्र येण्याची हाक दिली होती. या हाकेला साद देत लोक मोठ्या संख्येने पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झालेे.
या वेळी भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा बौद्धिक प्रमुख विजय वेदपाठक, एबीव्हीपीचे रायगड जिल्हा (उत्तर) संघटन मंत्री दर्शन बाबरे, मयुरेश नेतकर, शहर मंत्री वैष्णव देशमुख, महाविद्यालयीन प्रमुख यश म्हात्रे, कार्यालयीन मंत्री दिव्या घरत, कोषप्रमुख श्रावणी पांडव, हर्षद खाडे, प्रज्ञेश खेडकर, श्रेयस मांडगे, ओमकार सपकाळ, यश म्हात्रे, दिव्या घरत, श्रावणी पांडव, हर्ष राव, केवल दहिगावकर, संघाचे पंकज व्यवहारे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष व पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, हर्षवर्धन पाटील आणि असंख्य नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, सदस्य, तसेच उत्तराखंडचे नागरिक, आसामी, पंजाबी बांधवही आवर्जून हजर होते.