Breaking News

शेतकर्‍यांचा विश्वासघात

अपुर्‍या कर्जमाफीवर देवेंद्र फडणवीस यांची टीका

नागपूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार होते. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देणार होते, मात्र त्यांनी शब्द फिरवला. केवळ दोन लाखांची कर्जमाफी देऊन या सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना दोन लाखांची कर्जमाफी देण्याची घोषणा शनिवारी (दि. 21) विधानसभेत केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या घोषणेवर जोरदार टीका केली. राज्यात राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी शेतकर्‍यांना आठ हजार रुपये हेक्टरी पिकांकरता व 18 हजार रुपये फळबागांकरिता ही घोषणा करून पैसे दिले, तेवढेच पैसे शेतकर्‍यांना आता मिळणार आहेत. त्या काळात शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांना तातडीने प्रत्येकी 25 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना तिघाडी सरकारने एक नवा पैसा दिला नाही. त्यांनी दिलेले आश्वासन न पाळता शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याची आणि त्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी सातत्याने केली होती, मात्र ठाकरेंनी शब्द फिरवला. दोन लाखांपर्यतची कर्जमाफी जाहीर केली, पण या कर्जमाफीचा कोणताही तपशील सरकारने दिला नाही. त्यात पीक कर्जाचा समावेश आहे का? ट्रॅक्टर कर्जाचा समावेश आहे का? याचीही माहिती नाही. ही घोषणाच संभ्रम निर्माण करणारी आहे, असे सांगतानाच दोन लाखांत सातबारा कोरा होतो का? कर्जमुक्ती होते का? आणि शेतकरी चिंतामुक्त होतो का? असे सवालही फडणवीस यांनी केले.
याचबरोबर आमच्या सरकारने दीड लाखापर्यंत सरकट कर्जमाफी दिली होती. आम्ही त्यातून केवळ सरकारी नोकर आणि आमदार, खासदार वगळले होते. बाकी सर्व शेतकर्‍यांना दीड लाखाची कर्जमाफी दिली होती. आता या सरकारने घोषित केले आहे की, आम्ही सप्टेंबर 2019पर्यंतच्या शेतकर्‍यांना थकीत कर्जाची माफी देऊ. यात पीक कर्ज आहे का? की मध्यम मुदतीचे कर्ज आहे, की ट्रॅक्टरचेदेखील कर्ज आहे, की सर्वच प्रकारचे कर्ज आहेत. आम्ही पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज माफ केले होते, परंतु या ठिकणी तसे स्पष्ट झालेले नसल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply