मुंबई : प्रतिनिधी
येथील नऊ वर्षीय कँडिडेट मास्टर कुश भगत याने पॅरिस येथे झालेल्या खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले आहे. सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असणार्या कुशला आठव्या फेरीत पराभव पत्करावा लागला आणि नवव्या फेरीतील डाव बरोबरीत सोडवल्यामुळे त्याला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. त्याने नवव्या फेरीअखेर सहा गुणांची कमाई करीत तिसरे स्थान प्राप्त केले.
सुमारे 12 देशांतील बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. 1400 ते 2000 एलो रेटिंग गुण असलेल्या बुद्धिबळपटूंना या स्पर्धेत सहभाग देण्यात आला.
18वे मानांकन मिळालेल्या कुशने दुसर्या फेरीत अव्वल मानांकित फावरे मॅथ्यू याच्यावर मात करीत सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर तिसर्या फेरीत त्याने तौरे शांथी याला हरवले होते. या स्पर्धेद्वारे 118 एलो गुणांची कमाई करीत कुशने आपली रेटिंग संख्या 1800वर नेली.