देवकीबाई कातकरी सभापतिपदी विराजमान
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समितीच्या सभापतिपदी भारतीय जनता पक्षाच्या देवकीबाई लक्ष्मण कातकरी बिनविरोध निवडून आल्या असून, यानिमित्ताने येथील पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे.
पनवेल पंचायत समितीच्या सभापतिपद निवडणुकीसाठी भाजपच्या देवकीबाई कातकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. 30) तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. देवकीबाई यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
स्थापनेपासून पनवेल पंचायत समितीवर काँग्रेसचा एक अपवाद वगळता शेकापची सत्ता राहिली आहे. या वेळी सभापतिपदावरून पहिल्यांदाच सत्तापालट होत पंचायत समितीवर भाजपचा झेंडा डौलाने फडकला आहे. यामुळे विकासाला चालना मिळणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
नवनिर्वाचित सभापती देवकीबाई कातकरी यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष व पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, तनुजा टेंबे, रेखा म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पनवेल पंचायत समितीत भाजपचा सभापती झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
ग्रामीण जनतेत समाधान
पनवेल पंचायत समितीवर कै. हिराजी खारकर (काँग्रेस) यांचा 1974 ते 1979 या पाच वर्षांचा अपवाद वगळता गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ शेकापची सत्ता होती, मात्र तालुक्याच्या विकासाला पाहिजे तशी चालना मिळाली नाही. विशेष म्हणजे पंचायत समितीची इमारत अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. सहा दशके सत्ता उपभोगणार्यांनी फक्त दरवर्षी सभापती बदलाचा पायंडा पाडला. त्याला आता लोकांना अपेक्षित असलेला खंड पडला असून, याबद्दल ग्रामीण भागातील जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.