केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची लाभणार उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 2) पनवेलमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 9.30 वाजता होणार आहे.
खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात होणार्या या कार्यक्रमास रायगडचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल आहेत.
महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी लागते. ही चाचणी महागडी असल्याने महिला याकडे दुर्लक्ष करतात. या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्या दृष्टीने या लसीकरण महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ 11 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलींना घेता येणार असून किमान एक हजार मुलींचे लसीकरण करण्यात येणार असून त्याच्या यशस्वी नियोजनासाठी महिला मोर्चा सज्ज आहे.