पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात दोनदिवसीय महाअंतिम सोहळ्यास शुक्रवार (दि. 3) प्रारंभ झाला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन समारंभास सुप्रसिद्ध अभिनेते राजन भिसे, प्रदीप कबरे, भरत सावले, अभिनेत्री शर्वानी पिल्ले, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्याम फुंडे, खजिनदार अमोल खेर, स्मिता गांधी, गणेश जगताप, अभिषेक पटवर्धन, मयूरेश नेतकर आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी 11 एकांकिका सादर झाल्या.
आज पारितोषिक वितरण समारंभ सिने-नाट्य मान्यवरांची लाभणार मांदियाळी
अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात महाअंतिम सोहळ्याचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 4) सायंकाळी 6 वाजता आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व निर्माता प्रसाद कांबळी, सन्माननीय अतिथी म्हणून पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, सुप्रसिद्ध अभिनेते राजन भिसे, प्रदीप कबरे, भरत सावले, सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वानी पिल्लई, सुप्रसिद्ध निर्माती कल्पना कोठारी, दिग्दर्शक व अभिनेते दिनेश गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
नाट्यचळवळ वद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे जावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला.
नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. देखणे व नेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली. वाढत्या प्रतिसादामुळे आणि कलाकार व रसिकांच्या मागणीमुळे ही स्पर्धा कोकण व मुंबईपुरती मर्यादित न ठेवता राज्यस्तरीय करण्यात आली, तसेच बक्षिसांच्या रकमेतही भरघोस वाढ करण्यात आली. या दर्जेदार स्पर्धेचा नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व सभागृहनेते परेश ठाकूर, प्रमुख कार्यवाह शामनाथ पुंडे, स्पर्धा सचिव डॉ. वसंत बर्हाटे यांनी केले आहे.
अशी आहेत पारितोषिके
प्रथम क्रमांक एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना, त्याचबरोबर प्राथमिक फेरीतील सर्व विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper