Breaking News

हिवाळ्यातील शरीराची काळजी

नवे वर्ष सुरू होऊन पहिला पंधरवडा संपला. नवीन वर्षामध्ये अनेकांनी वेगवेगळे संकल्प केले असतात. त्यात आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्याकरिता अनेक गोष्टींचा ऊहापोह केला जातो. सध्या हिवाळा सुरू असून, गुलाबी थंडीत शरीरातही अनेक बदल घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक ठरते.

हिवाळा हा ऋतू जसा व्यायामाला उत्तम, तसाच तो पचनासाठीही उत्तम. हिवाळ्यात अन्नपचन लवकर होत असते. त्यामुळे भूकही अधिक वेळा लागते, पण ज्यांचे वजन वाढत चालले आहे, त्यांनी मात्र सांभाळून! हवेतील बदलामुळे काहींना सर्दी, ताप, खोकला आदी संसर्ग होण्याची भीती असते आणि त्यामुळे या दिवसांत आपली प्रतिकारशक्ती चांगली राहण्याची गरज असते. त्वचा आणि केस कोरडे पडत असल्यावर जसे बाहेरील शरीरावर उपाय केले जातात, त्याचप्रमाणे आंतरशरीराचीही योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांत मुख्य म्हणजे पाणी कमी प्यायले जाते. पाणी कसे आवर्जून प्यायले जाईल, याची काळजी घ्यायला हवी. थंड पाण्याऐवजी साधे पाणी, गरम किंवा कोमट पाणी, सूप, ग्रीन टी असे शरीराला गरमपणा देणारे पदार्थ आहारात घ्यावेत. त्वचा कोरडी पडू नये म्हणून आहारात योग्य प्रमाणात तेल, तूप, लोणीचा समावेश असावा. आवश्यक चरबीयुक्त पदार्थही शरीरात जाणे गरजेचे आहे. तेलासोबतच खोबरे, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या बिया याचाही आहारात समावेश करावा. त्वचा आणि केसाचा कोरडेपणा घालवण्यासाठी तेलाप्रमाणेच जीवनसत्त्व ई, ओमेगा, झिंक, सेलेनियम हेही आवश्यक असतात.

हिवाळ्याच्या दिवसांत आवळा भरपूर प्रमाणात मिळत असतो. आवळ्यात जीवनसत्व सी असते, ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, पचन चांगले होते आणि केस आणि डोळेही चांगले राहतात. घरी केलेला ताजा आवळारस अतिशय उत्तम. याशिवाय अनेक ताज्या भाज्या, फळे येतात. संत्री, मोसंबी, गाजर आणि इतर फळे, पालेभाज्या यातदेखील अधिक प्रमाणात जीवनसत्त्व सी आणि अ असते. हे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. साखरेपेक्षा जर उत्तम आणि शुद्ध मध मिळाला, तर वापरायला हरकत नाही, कारण त्यानेही प्रतिकारशक्ती वाढते.

हिवाळ्यात आहारामध्ये कोणत्या बाबी खाऊ नयेत असे पदार्थ फार कमी आहेत. त्यामुळे समतोल आहार हाच उत्तम आहार, मात्र ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी हा नियम लागू होत नाही. आहार आणि व्यायाम यांचा योग्य मेळ साधल्यास वजन कमी करणेही शक्य आहे. या दिवसांत खूप भूक लागते म्हणून जंक किंवा फास्ट फूडवर भर न देता घरी तयार केलेले पदार्थ पोटभर खावेत. वजन वाढवण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा उत्तम काळ आहे. या काळात हरभरे, हुरडा, वाटाणे, गाजर, स्ट्रॉबेरी अशा अनेक नैसर्गिक पदार्थांची बाजारात रेलचेल दिसते. तेव्हा यातील अधिकाधिक पदार्थाचा आहारात समावेश करावा. म्हणजे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply