पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभेत माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अयोध्येत राम मंदिराची निर्मितीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्यास उत्तर प्रदेश सरकारने सहमती दिल्याचेही त्यांनी सांगितले.
राम मंदिर ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार असून भव्य आणि दिव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी या ट्रस्टकडे 67 एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सांगितले.
भारताच्या ऑक्सिजनमध्ये, आदर्शांमध्ये आणि मर्यादांमध्ये भगवान श्रीराम आहेत, तसेच अयोध्येचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे आपण सर्वजण जाणतोच, असे सांगत अयोध्येत भगवान श्रीकाम यांच्या भव्य-दिव्य मंदिराच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. वर्तमान आणि भविष्यात रामलल्लाच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या व त्यांची श्रद्धा पाहूनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंकडून अभिनंदन
अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी केंद्र सरकारने ट्रस्टला मंजुरी दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पंतप्रधान मोदी यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन, अशा आशयाची मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
राज ठाकरेंकडून स्वागत
अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. ’केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल, अशी अपेक्षा आहे. या निर्णयासाठी मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन,’ असे ट्विट राज यांनी केले आहे.
एक विश्वस्त दलित समाजाचा
रामजन्मभूमीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार केंद्र सरकारने अयोध्येत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या नावाने ट्रस्ट स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टबाबत माहिती दिली. या ट्रस्टवर एकूण 15 विश्वस्त असणार आहेत. त्यापैकी एक विश्वस्त हा दलित समाजाचा असेल, असे शहा यांनी सांगितले.
सर्व जण एकाच कुटुंबाचे सदस्य
भारतात राहणारे हिंदू असोत, मुस्लिम असोत, शीख, ईसाई, बौद्ध, पारसी किंवा मग जैन असोत, हे सर्व एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले. या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याचा विकास व्हावा, ते सुखी राहावेत, देशाचा विकास व्हावा याच भावनेने माझे सरकार ’सबका साथ, सबका विश्वास’ या मंत्रावर चालत असल्याचेही त्यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper