Breaking News

विवेक पाटलांनी ठेवीदारांचा ‘सुताने’ कापला गळा!

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांची प्रचंड आर्थिक परवड होत आहे. यात वृद्ध, महिला, मुलाबाळांसह ग्रामपंचायती, सोसायट्या, छोटे-मोठे उद्योजक, स्वयंसेवी संस्था, सरकारी व निमसरकारी विभागांचेही पैसे अडकले आहेत. असे असताना बँक आणि बँकेशी संबंधित मंडळी मात्र चालढकल करीत आहेत. या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करणारी मालिका…
रायगड जिल्हा विशेष लेखा परीक्षकांना दिलेल्या जबाबामध्ये सीईओ हेमंत सुताने यांनी आपली बाजू मांडताना असे स्पष्ट केले आहे की, ही कर्ज प्रकरणे संचालक मंडळापुढे ठेवण्यापूर्वी त्या कर्ज प्रकरणांतील त्रुटींबाबत मी विशेषत: अध्यक्ष विवेक पाटील यांना अवगत करीत होतो, तसेच उत्पन्नाचा दाखला, जामीनदारांचे केवायसी, आयटी रिटर्न्स, तारण या रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाप्रमाणे आवश्यक असलेल्या बाबींकडे त्यांचे लक्षही वेधत होतो, मात्र मी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींची गांभीर्याने दखल न घेता व माझी कर्ज मंजुरीसाठी शिफारस नसताना कर्जे मंजूर केली, तसेच कर्जाच्या वाढीव रकमेचेही नूतनीकरण केले गेले.
याशिवाय अध्यक्ष विवेक पाटील यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून देत होतो की, कर्ज मंजुरीसाठी तसेच वाढीव रकमेचे नूतनीकरण करण्यासाठी कर्जदाराने काहीही तारण दिले नाही. त्यामुळे अनेक कर्जे विनातारण दफ्तरी दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे मंजूर केलेली कर्ज प्रकरणे व वाढीव मर्यादाप्रकरणी अंतर्भूत रकमांचे प्रत्यक्ष वितरण करण्यापूर्वी त्यावरील स्टॅम्प ड्युटी भरणे आवश्यक असल्याचेही मी अध्यक्ष विवेक पाटील यांना सांगितले होते, असे सुताने आपल्या जबाबात म्हणाले आहेत. एवढे सांगूनही अध्यक्ष विवेक पाटील यांनी मला स्पष्ट सूचना देऊन मंजूर केलेली कर्जे तसेच वाढीव मर्यादेचे वितरण करण्याच्या किंवा या रकमांचे इतर खात्यांमध्ये वर्ग करण्याच्या सूचना दिल्या, असेही सुताने यांनी जबाबात नमूद केले आहे.
कर्ज व वाढीव कर्ज मर्यादा मंजुरीपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने मंजुरीसाठी माझी शिफारस नसल्याचे संचालक मंडळाच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आले आहे, असे सांगून हेमंत सुताने यांनी अध्यक्ष विवेक पाटील यांच्या आदेशानुसारच आणि त्यांच्या प्रभावामुळे (दबावामुळे) सर्व 63 बनावट कर्जे वा वाढीव मर्यादा मंजुरी प्रकरणे संचालक मंडळात मंजूर करण्यात येऊन त्यांचे वितरण करण्यात आल्याचे सांगितले.
यावर कहर म्हणजे सुताने यांनी आपल्या जबाबात अखेरीस असेही म्हटले आहे की, मी मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने सर्व त्रुटींची कल्पना वेळोवेळी दिली असल्याने याबाबत मला जबाबदार धरण्यात येऊ नये. त्यांच्या या जबाबावर शेकाप नेते व कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी तर कडीच केली आहे. त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, हेमंत सुताने यांनी आपल्या नोटिसीस दिलेल्या उत्तरास मी सहमत आहे. आपण नमूद केलेल्या 63 कर्ज प्रकरणांची व इतर कर्ज प्रकरणांच्या कर्जमंजुरी व कर्जवसुलीबाबतची संपूर्ण जबाबदारी माझी आहे, तसेच बँकेतील झालेल्या संपूर्ण कर्जमंजुरी व कर्जवाटप हे माझ्या आदेशानेच संचालक मंडळाने मंजूर केले आहे. या कर्ज प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांबाबत संचालक व बँकेचे अधिकारी यांनी सूचित केले होते. त्यामुळे या सर्व कर्ज प्रकरणांस संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व बँकेचे अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येऊ नये. हा जबाब विवेक पाटील यांनी गुरुवार दि. 5 डिसेंबर 2019 रोजी दिला आहे.
सभासद, ठेवीदार, खातेदारांच्या ठेवी धोक्यात
बँकेतील सारेच जबाबदार; गुन्हा दाखल होणे आवश्यक

कर्नाळा बँकेतील सर्व कर्जमंजुरी प्रकरणे, कर्जमर्यादा वाढविणे या सर्व बाबींना आपण जबाबदार नसल्याचे आणि अध्यक्ष विवेक पाटील जबाबदार असल्याचे बँकेचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर बँक अधिकार्‍यांनी कबुलीपत्र दिले असले तरी बँकेच्या पोटनियम 44 व 50च्या तरतुदीनुसार बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, बँकेचे पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित बँक अधिकारी आणि सर्व (बनावट) कर्जदार यांनी संगनमताने केलेल्या विनातारणी कर्जवाटपामुळे, गैरविनियोग व गैरवापरामुळे बँकेचे सभासद, ठेवीदार व खातेदार यांच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे या सर्व जबाबदार व्यक्तींवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 88नुसार जबाबदारी निश्चित करण्यात येऊन कारवाई होणे आवश्यक ठरते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात सर्वांवर गुन्हा दाखल होणे आवश्यक असल्याचे विशेष लेखा परीक्षण अहवालात ठळकपणे म्हटले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply