महाड ः प्रतिनिधी : नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्वराज्यासाठी मोलाचे योगदान होते. त्यांचा त्याग आणि शौर्यगाथा जगामोर आणण्यासाठी उमरठ गावातील त्यांच्या स्मारकाचा पर्यटनाच्या धर्तीवर विकास होण्यासाठी आपण सरकारकडे 100 कोटींची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 17) नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथीदिनी उमरठ येथे केले, तसेच मुख्यमंत्र्यांनी नरवीर तानाजी मालुसरेंच्या स्मारकाला भेट द्यायला हवी होती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी सोमवारी उममठ येथे साजरी करण्यात आली. या वेळी भाजपचे नेते विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी समाधीस्थळी आणि स्मारकाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन अभिवादन केले. दरम्यान, या वेळी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ समाधीस्थळी येऊन धुरळा उडवून गेले. मुख्यमंत्री स्मारकाच्या ठिकाणी फिरकलेदेखील नाहीत. त्यामुळे स्थानिक पोलादपूरवासीयांनी नाराजी व्यक्त केली.
या वेळी आ. दरेकर म्हणाले की, काही लाखांत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाचा विकास शक्य नाही. हा विकास पर्यटनाच्या धर्तीवर होण्यासाठी 100 कोटींच्या निधीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, उप जिल्हाध्यक्ष राजेय भोसले, पोलादपूर तालुकाध्यक्ष प्रसन्न पालांडे, नरवीर तानाजी मालुसरे स्मारक समितीचे सदस्य, महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, संदीप ठोंबरे, महेश शिंदे आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper