पनवेल ः प्रतिनिधी
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान व गोरगरीब कष्टकर्यांचे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 27) कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, प्राचार्य वसंत बर्हाटे आदी उपस्थित होते.
स्व. जनार्दन भगत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रथमच देण्यात येणार्या या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्याचे उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, तर रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगिरथ शिंदे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, उपमहापौर जगदिश गायकवाड, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर स्वतः विशेष लक्ष देत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांसह संचालक मंडळ व सहकारी विशेष मेहनत घेत आहेत.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …