

खालापूर : अरुण नलावडे
तालुक्यातील खरसुंडी गावाची पाणीपुरवठा योजना असलेल्या नाल्यात गेल्या आठ दिवसांपासून रात्रीच्यावेळी कपड्यांना रंग देण्याचे काम करणार्या रुबी मिल्स कंपनीचे घातक रसायन व सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जल व वायू प्रदूषण होत असल्याने खरसुंडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
रुबी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि खालापूर तहसील कार्यालयाकडे केली असून, कारखान्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास नाल्यात सोडलेल्या घातक रसायन व सांडपाणी भरलेल्या बाटल्या अधिकार्यांच्या दालनात रिकाम्या करण्याचा इशारा गावातील शिवसैनिकांनी दिला आहे. खरसुंडी गावातील दिगंबर सालेकर व शिवसेना शाखाप्रमुख विलास बारस्कर यांना गुरुवारी (दि. 14) सकाळी रुबी मिल्स या कारखान्यातून घातक रसायन व सांडपाणी गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या नाल्याशेजारी आढळून आले. त्याच्या वासाने परिसरात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. याबाबत दिगंबर सालेकर व विलास बारस्कर यांनी कारखाना व्यवस्थापकाला विचारणा केली असता, त्याने नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवण्याचे काम केले. याबाबत ग्रामस्थांनी संबंधित खात्यांना निवेदन देत इशारा दिला आहे.
कपड्यांना रंग देण्याचे काम करणारा हा कारखाना मागील दोन वर्षे प्रदूषण व नदीपात्रात घातक रसायन सोडून पात्रातील जीव नष्ट होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत असून अनेकवेळा संबंधित खात्यांना पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान, रुबी मिल्समध्ये कपड्यांना रंग देण्यासाठी वापरण्यात येणारे घातक रसायन प्रक्रिया न करताच नाल्यात सोडले जाते. हा नाला पाताळगंगेला जाऊन मिळतो. त्यामुळे नदीचे पाणीही दुषित होतेे. परिणामी नदी पात्रातील जलचर व उन्हाळी भातशेती तसेच भाजीपाला शेती करपून शेतकर्यांचे नेहमीच नुकसान होत आहे. तसेच मासेमारी व्यवसाय धोक्यात आल्याने या परिसरातील आदिवासींवर उपासमारीची वेळ आली असल्याचे विलास बारस्कर यांनी सांगितले.
रुबी मिल्स कंपनीकडे जल शुद्धीकरणाची यंत्रणा किंवा सीईटीपी प्लांट नाही. तसेच कंपनीचे किमान पाच हजार लिटर घातक सांडपाणी तळोजा येथील शासकीय सीईटीपी प्लांटपर्यंत वाहून नेणे मोठ्या खर्चाचे असल्याने घातक रसायनयुक्त सांडपाणी नाल्यातून थेट पाताळगंगा नदीच्या पात्रात बिनबोभाट सोडण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थ दिगंबर सालेकर यांनी दिली.
रुबी मिल्स कारखान्यातून नेहमी थेट पाताळगंगा नदीपात्रात सांडपाणी सोडले जाते. त्याबाबत नगरसेवक या नात्याने मी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. सांडपाणी सोडल्याने आरोग्याचा आणि उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला असून तहसीलदारांनी या कारखान्यावर कठोर कारवाई करावी.
-प्रकाश नाईक, नगरसेवक, खालापूर नगर पंचायत
जल प्रदूषण केल्याबद्दल यापूर्वीही रुबी मिल्सवर कारवाई करण्यात आली होती. आता ग्रामस्थांची तक्रार आल्यास या कारखान्यावर कारवाई केली जाईल.
-सचिन आडकर, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
RamPrahar – The Panvel Daily Paper