Breaking News

राज्यात कोरोनाचा चौथा बळी

65 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी

जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून राज्यात मंगळवारी (दि. 24) कोरोनामुळे 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. या मृत्यूमुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. मंगळवारी मृत्यू झालेला इसम 15 मार्च रोजी यूएईहून भारतात आला होता. प्रथम तो अहमदाबादेत आला व नंतर मुंबईत आला होता. ताप, खोकला व श्वसनाच्या त्रासामुळे संबंधित व्यक्तीला 23 मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला उच्च रक्तदाब आणि डायबिटीसचा विकारही होता. कोरोनाच्या आजाराची लक्षणे असल्याने त्याची तातडीने चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उत्तरोत्तर प्रकृती खालावत जाऊन मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. दरम्यान, मंगळवारी राज्यात आणखी चार नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 101वर पोहचली आहे. मुंबईत आतापर्यंत 41, पुणे 19, पिंपरी-चिंचवड 12, नागपूर 4, यवतमाळ 4, कल्याण 4, नवी मुंबई 4, सांगली 4, नगर 2, सातारा 2 आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद आणि रत्नागिरीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply