Breaking News

पत्रकार संघर्ष समितीकडून गोरगरीब आणि दानशूरांना आवाहन

पनवेल : वार्ताहर

उपासमारीमुळे कोणाचा बळी जाऊ नये, या हेतूने पनवेलमधील पत्रकारांची सेवाभावी संस्था पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्याकडून ज्या ठिकाणी खरोखर उपासमार आहे व ज्याठिकाणी एका वेळचे अन्नदेखील काही लोकांना मिळत नाही अशा गरजू ठिकाणी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यात अद्यापही अनेक अशा आदीवासी वाड्या, अनेक गरीब वस्ती आहेत जिथे अद्यापही मदत पोहचली नाही त्या ठिकाणचा शोध घेऊन त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आम्ही संघर्ष समितीचे ज्येष्ठ सल्लागार माधव पाटील व सुनील पोतदार यांच्या मार्गदर्शनानुसार पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून करणार असल्याचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी सांगितले. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांना या सेवेबद्दल माहिती व्हावी व त्या अनुषंगाने त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्यासाठी हे प्रसिद्ध केली जात असून ज्या दानशूर लोकांना जीवनाश्यक वस्तू द्यायच्या असतील त्यांनी समितीच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील समितीतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी खजिनदार केवल महाडिक, सरचिटणीस मंदार दोंदे, कार्याध्यक्ष संजय कदम, सल्लागार विवेक पाटील मेहनत घेत आहेत.

रिक्षाचालकांमध्ये हाणामारी

नागोठणे ः रिक्षा उभी करण्याच्या वादातून हाणामारी झाल्याचा प्रकार पोलीस ठाणे हद्दीत पेण तालुक्यातील आटीवली, शिहू गावात सोमवारी सायंकाळी उशिरा घडला. या हाणामारीत दोन्ही गटांतील पाच-सहा जण जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना अलिबागच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नागोठणे पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा दोन्ही गटांतील 10 जणांना ताब्यात घेऊन मंगळवारी दुपारी त्यांना पेणच्या न्यायालयात हजर केले असता एका गटातील पाच जणांना न्यायालयाकडून जामीन मिळाला, तर दुसर्‍या गटातील पाच जणांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख करीत आहेत.

कर्जतमध्ये हनुमान जयंती साधेपणाने

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जतमधील बहुतांश गावांत श्री हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने अत्यंत साधेपणाने हनुमान जयंती साजरी करण्यात आली. काही गावांत रामनवमीपासूनच सप्ताहभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हनुमान जयंती साजरी करण्यात येत असे. मारुतीरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागत, मात्र यंदा जगभर कोरोनाच्या संकटामुळे राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील गावागावांत हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

बोर्लीत मद्यविक्री; दोघांवर गुन्हा दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा शासकीय आदेश झुगारून बियरची विक्री करीत असलेल्या बोर्ली येथील साहिल बियर शॉपीवर रेवदंडा पोलिसांनी धाड टाकली. तेथून बियरचा साठा जप्त करून मालक व विक्री करणारा नोकर अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवदंडा पोलिसांनी मंगळवारी (दि. 7) सायंकाळी चारच्या सुमारास बोर्ली येथील साहिल बियर शॉपमधून मद्याची होणारी विक्री रंगेहाथ पकडली. तेथून वेगवेगळ्या कंपन्यांचा बियरचा एक लाख 29 हजार 800 रुपये किमतीचा साठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी बियर शॉपचे मालक गजानन बाळकृष्ण राणे (रा. कुरूळ, ता. अलिबाग) आणि नोकर निलेश श्रीकृष्ण सुर्वे (रा. बोर्ली, ता. मुरूड) या दोघांवर मुंबई प्रोव्हिजन अ‍ॅक्ट कलम 65 खंड (आय) 89 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे कलम 51 (ब) साथीचे रोग अधिनियम 1897चे कलम 2,3,4 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020चे नियम क्रमांक 11चे उल्लघंन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘त्या’ बाळाची चाचणी निगेटिव्ह

नवी मुंबई : बातमीदार

कोरोनाची बाधा झालेल्या एका महिलेची नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात सुखरूप प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आलेले असतानाच, यातून दुसरी व सर्वांनाच दिलासदायक बातमी समोर आली आहे. या कोरोनाबधित महिलेने जन्म दिलेल्या बाळाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.  नवी मुंबई, घणसोली येथील गरोदर महिलेला कोरिनाची बाधा झाल्याचे उघड झाले होते. त्यातच या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात नवी मुंबई महापालिकेच्या डॉक्टर्सना यश येऊन या महिलेने मुलीला जन्म दिला होता. मात्र तरीही कोरोनाबाधित महिलेने जन्म दिलेल्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे का, याकडे सर्वच डॉक्टर्सचे लक्ष लागले होते. या बाळाला आईपासून वेगळे ठेवण्यात आले होते, तसेच 24 तास बाळाच्या आरोग्याकडे डॉक्टर्सची टीम लक्ष ठेवून होती. तसेच सुरक्षिततेपायी बाळाची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. तो अहवाल पालिकेला आ प्राप्त झाला असून त्यात बाळाची चाचणी निगेटिव्ह आल्याने हा सर्वात मोठा दिलासा गरोदर महिलांसाठी मानला जात आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply