अलिबाग ः प्रतिनिधी
लॉकडाऊनमध्ये कोणीही उपाशी राहू नये म्हणून अन्न नागरी पुरवठा विभागाकडून उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात पाच हजार 152 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप केले. आतापर्यंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना 16.5 मेट्रिक टन मोफत तांदूळ वितरित झाला. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे दोन हजार 598 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे, त्या ठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना 1 एप्रिलपासून या महिन्याचे नियमित अन्नधान्य वितरणास सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वितरणासही जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली आहे.