पोलादपूर : प्रतिनिधी
चैत्र प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच गुढीपाडव्याच्या दिवशी वादळी पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील 87 पैकी 37 गावांमधील शेतकर्यांना आर्थिक फटका बसला असून यामध्ये 35 गांवातील शेतकरी आंबा उत्पादक असल्याचा प्राथमिक अंदाज पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांच्या कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालामध्ये व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून नागरिकांना उत्पन्नाचे साधन राहिले नाही. अशातच, पावसाळयापूर्वीची घरांची दुरूस्तीची कामे करण्याकडे कल असलेल्या नागरिकांना गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी अचानक उठलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळीवार्याने चांगलेच झोडपले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व्यग्र असताना या अवकाळी पावसामुळे गावोगावी जाऊन पंचनामे करताना फार मोठया अडचणींना कृषी विभागाच्या पर्यवेक्षक,सहायक आणि कर्मचार्यांना सामोरे जावे लागले असून पर्जन्यमान कमी आणि जोरदार वादळ या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादक शेतकर्यांना एकूण हेक्टरी नुकसानीच्या 30 टक्के वरील नुकसान गृहित धरण्यात आले असून काही ठिकाणी नजर पंचनामे करण्यात आल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.
या अहवालानुसार बोरावळे सजेतील बोरावळे 4 शेतकरी 9450 रूपये, घागरकोंड 2 शेतकरी 1800 रूपये, रानवडी 10 शेतकरी 40320 रूपये, पळचिल सजेतील पळचिल 6 शेतकरी 10800 रूपये, गोलदरा 3 शेतकरी 1800 रूपये, कातळी 7 शेतकरी 12600 रूपये, चांभारगणी सजेतील चांभारगणी 1 शेतकरी 900 रूपये, ताम्हाणे 2 शेतकरी 900 रूपये, किनेश्वर 2 शेतकरी 1800 रूपये, पैठण सजेतील पैठण येथील 2 शेतकरी 44910रूपये, क्षेत्रपाळ 5 शेतकरी 45270 रूपये, आदी आंबा उत्पादक शेतकर्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याखेरिज, सवाद सजेमधील हावरे येथे 2 शेतकर्यांचे 10800 रूपयांचे भाजीपाला उत्पादनाचे नुकसान झाले असून लोहारे सजेतील दिविल येथील एका शेतकर्याचे 1800 रूपयांचे भाजीपाला उत्पादनाचे
नुकसान झाले आहे.
-पोलादपूर तालुक्यातील एकूण 53.21 हेक्टरमधील 155 आंबा उत्पादक तर 3 भाजीपाला उत्पादक शेतकरी गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने बाधित झाले असून 4 लाख 78 हजार 890 रूपयांच्या हानीचा प्राथमिक अंदाज प्राप्त झाला आहे. याखेरिज, तालुक्यात11 व 12 एप्रिल सलग दोन दिवस अवकाळी पाऊस झाला असून काही भागात गारांचा वर्षावही झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, या काळात आणखी कोणत्या आंबा अथवा भाजीपाला उत्पादक शेतकर्यांचे नुकसान झाले याचा अद्याप अहवाल तयार झाला नाही.
RamPrahar – The Panvel Daily Paper