आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
20 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यावर संपूर्ण रायगड जिल्हा लॉकडाऊन न करता ते तालुकानिहाय करावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांना संबोधित करताना देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम राहणार असल्याचे जाहीर केले, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात राज्य शासनाने याआधीच 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या प्रभावानुसार प्रत्येक जिल्ह्याची विभागणी करण्यात येत असून रायगड जिल्ह्याला रेड झोनमध्ये ठेवण्यात आल्याचे समजते. याच विषयास अनुसरून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनाची वर्गवारी महाराष्ट्रात जिल्ह्यानुसार नव्हे, तर तालुक्यांतर्गत करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
सध्या जगात, देशात तसेच महाराष्ट्रात कोरोना या रोगाने थैमान घातले असून विशेषतः मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाटत आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होण्यासाठी 14 एप्रिल रोजी संपणारा लॉकडाऊन हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या प्रभावानुसार विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशी होणार आहे. यात रेड झोन म्हणजे अतिसंक्रमित क्षेत्र, ऑरेंज म्हणजे काहीशा प्रमाणात संक्रमित क्षेत्र आणि ग्रीन झोन म्हणजे अंशतः संक्रमित अथवा असंक्रमित क्षेत्र असे असणार आहे. दुसरीकडे 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचे मूल्यांकन केले जाणार आहे. जे प्रदेश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथिल केले जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
यानुसार जर पहिले गेले तर रायगड जिल्ह्यात पनवेल आणि उरण तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नगण्य असून, अशा तालुक्यांतील नागरिक, व्यावसायिक तसेच उद्योगांना या लॉकडाऊनचा फटका बसत आहे. ते लक्षात घेता रायगड जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यास अर्थव्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे 20 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल होताना याचा विचार करावा, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper